घरमहाराष्ट्रBMC alert : डेंग्यू, मलेरियाला रोखण्यासाठी मुंबई मनपाकडून उपाययोजना

BMC alert : डेंग्यू, मलेरियाला रोखण्यासाठी मुंबई मनपाकडून उपाययोजना

Subscribe

मुंबई : मुंबईमध्ये पावसाळ्यात डेंग्यू (Dengue), मलेरिया (Malaria) यासारख्या आजारांचे प्रमाण वाढून रुग्ण दगावण्याच्या घटना घडतात. त्यामुळे मुंबई महापालिका (Brihanmumbai Municipal Corporation) कीटकनाशक विभागाने (Department of Pesticides) डेंग्यू, मलेरियाला रोखण्यासाठी आतापासूनच ठोस व प्रभावी उपाययोजना हाती घेतली असून त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात करण्यात आली आहे.

महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल चहल यांच्या अध्यक्षतेखाली आणि अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शासकीय, निमशासकीय, यंत्रणांचा समावेश असणारी डास निर्मूलन समितीची बैठक लवकरच आयोजित करण्यात येणार आहे. केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्‍य सार्वजनिक बांधकाम विभाग, मध्‍य रेल्‍वे, पश्चिम रेल्‍वे, म्‍हाडा, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई विमानतळ, मुंबई पोर्ट ट्रस्‍ट, लष्कर, नौदल, हवाई दल, सैन्‍यदल अभियांत्रिकी सेवा, बेस्‍ट, डाक विभाग, एमटीएनएल, बीएसएनएल, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि., भाभा अणुसंशोधन केंद्र, महावितरण, दुग्ध विभाग अशा शासकीय, निमशासकीय यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी, प्रतिनिधी या बैठकीत सहभागी होतील.

- Advertisement -

कीटकनाशक विभागाच्या उपाययोजना
मुंबई महापालिका, सरकारी कार्यालये, इमारत बांधकामे, खासगी सोसायट्या, झोपडपट्ट्या आदी ठिकाणी डास प्रतिबंधाच्या अनुषंगाने पावसाळापूर्व कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पाण्याच्या टाक्या डास प्रतिबंधक स्थितीत करणे, अडगळीतील वस्तू निष्कासित करणे यात अपेक्षित आहे. तसेच डासांच्या उत्पत्ती स्थानांमध्ये पाण्याच्या टाक्या, टायर, इतर वस्तू, पेट्री प्लेट्स, फेंगशुई झाडे, मनी प्लांट इत्यादी ठिकाणीही कार्यवाही अपेक्षित आहे.

खासगी सोसायट्यांमध्ये कीटकनाशक विभागाकडून तपासणी करण्याच्या तसेच सोसायटीच्या पदाधिकाऱ्याना किंवा मालकांना त्यांच्या परिसरात डेंग्यू, मलेरिया प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबईत सध्या किमान अडीच हजार ठिकाणी इमारत बांधकामे सुरू आहेत. अशा ठिकाणी असणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या स्वयंसेवकांकडून अळीनाशकांची फवारणी केली जात आहे. तसेच बांधकाम कामगारांच्या राहत्या जागेतही भिंतींवर इन्डोअर रेसिड्यूल स्प्रेइंग (आयआरएस) कीटकनाशकांची फवारणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

- Advertisement -

झोपडपट्टीच्या ठिकाणी पाण्याच्या टाक्या झाकून ठेवण्याबाबत तसेच अडगळीतील जागेच्या वस्तू शोधून निष्कासित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासोबतच त्यासोबतच डेंगी आणि चिकुनगुनिया प्रसारक (एडिस) डासांच्या सर्वेक्षणाची मोहीम हाती घेण्यात आली. कीटकनाशक विभागाचे अधिकारी, कर्मचारी व कामगार यांच्या माध्यमातून हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती आढळणाऱ्या ठिकाणी धूम्रफवारणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नागरिकांकडून अपेक्षित उपाययोजना

  1. घरातील व परिसरातील अडगळीतील साहित्य काढून टाकणे
  2. पाण्याच्या टाक्या झाकून ठेवणे, टायर्स, भंगार साहित्य, डबे इत्यादी निष्कासित करणे
  3. घरातील शोभिवंत फुलदाण्या, त्याखालील बशा, शोभिवंत कृत्रिम कारंजी, फेंगशुईची झाडे यामधील पाणी आठवड्यातून कमीत-कमी दोन वेळा बदलणे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -