घरमहाराष्ट्रBMC water tax : पाणीपट्टी वाढीला भाजपाचा विरोध, प्रस्ताव फेटाळण्याची पालिकेला विनंती

BMC water tax : पाणीपट्टी वाढीला भाजपाचा विरोध, प्रस्ताव फेटाळण्याची पालिकेला विनंती

Subscribe

मुंबई : आधीच महागाईचे चटके सहन करणाऱ्या मुंबईकरांचे पाणी देखील महागणार आहे. मुंबईकरांच्या पाणीपट्टीत (BMC water tax) 6 ते 7 टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. येत्या 16 जून 2023पासून त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. या प्रस्तावित पाणीपट्टी वाढीला भाजपाने (BJP) विरोध केला आहे.

- Advertisement -

राज्य सरकारच्या अप्पर वैतरणा आणि भातसा तलावातून पाणी उपसण्यात येते आणि यासाठी होणारा खर्च, कर्मचाऱ्यांचा वाढीव आस्थापना खर्च, वीजबिलात होत असलेली वाढ या सगळ्यांचा विचार करून मुंबईकरांच्या पाणीपट्टीत 6 ते 7 टक्क्यांची वाढ करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. पाणीपट्टी वाढीचा हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठीमहानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल (BMC Commissioner Iqbal Singh Chahal) यांच्यासमोर असून त्यांच्याकडून त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यानंतर या वाढीव पाणीपट्टीची 16 जून 2023पासून अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.

जलअभियंता खात्याचा आस्थापना खर्च (कर्मचाऱ्यांचा पगार व अन्य भत्ते), प्रशासकीय खर्च, वीजबिल, शासनाच्या अप्पर वैतरणा आणि भातसा तलावातून उपसा केल्या जाणाऱ्या पाण्यावरील कर या खर्चाचा एकत्रितपणे आढावा घेऊन दरवर्षी पाणीपट्टीत वाढ केली जाते. वाढत्या खर्चानुसार पाणीपट्टीत वर्षाला 8 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा अधिकार स्थायी समितीने प्रशासनाला दिला आहे. त्याआधारे आताही पाणीपट्टी वाढीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

हेही वाचा – एकत्रित निवडणुका लढविणार आणि बहुमताने जिंकणार…, अमित शाहांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदेंचा दावा

मात्र या प्रस्तावित पाणीपट्टी वाढीला भाजपाने विरोध केला आहे. मुंबई महानगरपालिकेने 16 जून 2023पासून पाणीपट्टी दरामध्ये वाढ करण्याची तयारी सुरू केली आहे. लिटरमागे 25 पैसे ते चार रुपयांपर्यंत ही वाढ प्रस्तावित आहे. आमचा या दरवाढीला तीव्र विरोध आहे. मुंबईकरांना मालमत्ता करात सूट देऊन एका हाताने द्यायचे आणि त्याच्याबरोबरीने पाणीपट्टी वाढवून दुसऱ्या हाताने काढून घ्यायचे, अशी टीका मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. पाणीपट्टीत वाढ करू नये, अशी विनंती त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घेऊन केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -