घरमहाराष्ट्रवीट अडचणीच्या ‘भट्टी’त!

वीट अडचणीच्या ‘भट्टी’त!

Subscribe

दर कडाडण्याची शक्यता

लांबलेल्या पावसामुळे बागायतदार, शेतकर्‍यांप्रमाणेच वीटभट्टी व्यावसायिकही अडचणीत आले आहेत. या वर्षी विटांचे दर कडाडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मजुरीचे दर, आवश्यक साहित्याचे वाढलेले दर यामुळेही व्यावसायिकांपुढे पेच निर्माण झाला आहे.

ऑक्टोबर महिना संपला की वीटभट्टी व्यवसायाला प्रारंभ होतो. त्यापूर्वी भाताचा तूस जमा करणे, भट्टीच्या जागेवरील माती काढणे, कामगारांची जमवाजमव करणे आदी कामे केली जातात. मात्र यावर्षी झालेल्या अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे वीटभट्टीला सुरुवात करण्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. अजूनही पावसाचे सावट असल्याने हा व्यवसाय सुरू करायचा की नाही, अशी व्यावसायिकांची द्विधा मनःस्थिती झाली आहे.

- Advertisement -

पेण तालुक्याात 40 ते 45 वीटभट्टी व्यावसायिक आहेत. मात्र तूस, माती, कामगारांची मजुरी या खर्चाची घडी बसत नसल्याने व्यवसाय कसा करायचा, असा सवाल अनेकांपुढे उभा ठाकला आहे. अधिकृत रेती व्यवसाय बंद असल्याने बांधकाम व्यावसायिक इमारतींसाठी सिमेंटच्या ठोकळ्यांचा वापर करीत असल्याचा फटकाही वीट व्यवसायाला बसला आहे. वीटभट्टी व्यवसाय अडचणीत येत असताना या ठिकाणी मोलमजुरी करणार्‍या आदिवासी मजुरांसमोर रोजगाराचीही समस्या निर्माण झाली आहे.

विटांसाठी प्रामुख्याने भाताचा तूस (तांदळाच्या दाण्यावरील टरफल) महत्त्वाचा असतो. परंतु यावर्षी लांबलेल्या पावसामुळे भाताचे उत्पादन घटल्याने तूस मिळण्याचे प्रमाण घटणार आहे. परिणामी तुसाचेही भाव वाढण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसाच्या शक्यतेने व्यावसायिक द्विधा मनःस्थितीत असताना भट्टीसाठी प्रामुख्याने वापरली जाणारी शेतीची जागा अद्याप ओलसर असल्याने विटासाठी लागणारी माती उपलब्ध होण्यास वेळ लागणार आहे. चारही बाजूंनी अडचणींनी घेरल्याची स्थिती सध्या वीटभट्टी व्यावसायिकांची झाली आहे.

- Advertisement -

अशी तयार होते वीट..
वीटा तयार करण्यासाठी शेतामध्ये किंवा माळरानावर मोठे अंगण बनविले जाते. याठिकाणी चौकोनी आकाराचे मोठे खड्डे खोदले जातात ज्याला कोंडी म्हणतात. या कोंड्यामध्ये पाणी भरले जाते आणि त्यात विटांसाठी लागणारी सुकलेली योग्य माती टाकून तूस मिसळला जातो. ही माती दोन दिवसानंतर कोंडीतून बाहेर काढून दुसर्‍या दिवशी मळून तिचे गोळे केले जातात आणि साच्यामध्ये टाकून विटा तयार करून मोकळ्या जागेत सुकविल्या जातात. या कच्च्या विटांची भट्टी रचून कोळसा, तूस, लाकडे यांच्या सहाय्याने त्या लाल-काळपट होईपर्यंत भाजल्या जातात.

अवकाळी पावसामुळे भात पिकांचे नुकसान झाल्याने वीटभट्टीसाठी लागणारा भाताचा तूस मुबलक प्रमाणात मिळेल का, याबाबत साशंकता आहे. अद्यापही पावसाचे सावट असल्याने हा व्यवसाय अडचणीत आला आहे.
-राजेश म्हात्रे, वीटभट्टी व्यावसायिक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -