घरमहाराष्ट्रमंत्रिमंडळ विस्तार पुन्हा रखडला, मुख्यमंत्र्यांनी अतिरिक्त खाती सोपवली आता 'या' मंत्र्यांकडे

मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा रखडला, मुख्यमंत्र्यांनी अतिरिक्त खाती सोपवली आता ‘या’ मंत्र्यांकडे

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडील 9 अतिरिक्त खाती इतर मंत्र्यांकडे सोपवली आहेत. उद्योगमंत्री असलेल्या उदय सामंतांकडे माहिती आणि तंत्रज्ञान खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून हिवाळी अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळातील दुसऱ्या टप्प्यातील विस्तार होईल, असं सांगितलं जात होतं. परंतु तो मंत्रिमंडळ विस्तार आता रखडला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर स्वतःकडची अतिरिक्त खातीसुद्धा इतर मंत्र्यांकडे सोपवली आहेत. शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळात सध्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि 18 कॅबिनेट मंत्री पकडून जवळपास 20 मंत्री आहेत. त्यामुळे अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करावा, अशी शिंदे गटातील आमदार आणि भाजप आमदारांची मागणी होती. परंतु आता मंत्रिमंडळ विस्तार होणार नसून महामंडळांचं वाटप होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मंत्रिपदाऐवजी आमदारांना महामंडळ देऊन खूश करण्याचा प्रयत्न शिंदे-फडणवीस करणार असल्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडील 9 अतिरिक्त खाती इतर मंत्र्यांकडे सोपवली आहेत. उद्योगमंत्री असलेल्या उदय सामंतांकडे माहिती आणि तंत्रज्ञान खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच राज्य उत्पादन शुक्ल मंत्री असलेल्या शंभुराज देसाईंकडे मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे असलेले परिवहन, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम) हे खातं सोपवलं आहे. बंदरे आणि खनिकर्म मंत्री असलेल्या दादा भुसे यांच्याकडे पणन खाते दिले आहे. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री असलेल्या संजय राठोड यांच्याकडे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य खाते सोपवले आहे. सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे मृद आणि जलसंधारण खात्याचा अतिरिक्त भार देण्यात आला आहे. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे अल्पसंख्याक आणि औकाफ खाते देण्यात आले आहे. शालेय शिक्षणमंत्री असलेल्या दीपक केसरकरांकडे पर्यावरण व वातावरणीय बदल, सामान्य प्रशासन ही खाती सोपवण्यात आली आहेत. रोजगार हमी योजना मंत्री असलेल्या संदिपान भुमरेंकडे मदत आणि पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन खाते देण्यात आले आहे. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांकडे माहिती आणि जनसंपर्क खाते सोपवण्यात आले आहे.

- Advertisement -

दुसरीकडे दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार नव्या वर्षात 26 जानेवारीपूर्वी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विशेष म्हणजे शिंदे गटातील 16 आमदारांच्या अपात्रतेची कारवाई सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. तसेच त्यावरच्या सुनावणीला तारीख पे तारीख मिळत आहेत. आता ही सुनवाणी थेट पुढच्या वर्षांत म्हणजे 13 जानेवारी 2023 रोजी होणार आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील हा मंत्रिमंडळ विस्तार 26 जानेवारीदरम्यान होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे.


हेही वाचाः शिंदे सरकार मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या विस्तारासाठी नवा मुहूर्त 26 जानेवारीपूर्वी?

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -