शिंदे सरकार मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या विस्तारासाठी नवा मुहूर्त 26 जानेवारीपूर्वी?

मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर जवळपास 40 दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार झाला. आता दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पण एकूण परिस्थिती पाहता, हा मंत्रिमंडळ विस्तार नव्या वर्षात 26 जानेवारीपूर्वी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

राज्यात विधान परिषद निवडणुकीनंतर अतिशय वेगात नाट्यमय घडामोडी घडल्या. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या 39 आणि अन्य 10 आमदारांनी बंडाचे निशाण फडकावले. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारला 29 जूनला पायउतार व्हावे लागले. लगेच दुसऱ्या दिवशी 30 जूनला मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर जवळपास 39 दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार झाला. यात भाजपा आणि शिंदे गटाचे प्रत्येकी आठ मंत्री आहेत.

त्यातच दुसरीकडे हा सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयाच्या दरवाजापर्यंत पोहोचला आहे. विविध याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. 16 आमदारांच्या अपात्रतेची याचिका (ठाकरे गटाकडून), विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव (शिंदे गटाकडून) यासह आणखी चार याचिकांवर सर्वांत आधी 21 जुलै रोजी सुनावणी झाली होती. तर, शेवटची सुनावणी 1 नोव्हेंबर रोजी झाली होती. दोन्ही याचिकाकर्त्यांनी तीन आठवड्यांत संयुक्तपणे लिखित बाजू मांडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालायने दिले होते. त्यानुसार 29 नोव्हेंबर रोजी सुनावणी झालीच नाही. आता ही सुनवाणी थेट पुढच्या वर्षांत म्हणजे 13 जानेवारी 2023 रोजी होणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराचा लांबलेला हा दुसरा टप्पा 26 जानेवारीपूर्वी होईल, अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे.

मात्र, या विस्तारानंतर सत्ताधारी काही आमदारांची, विशेषत: शिंदे गटातील आमदारांची उघड नाराजी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. पहिल्या विस्ताराच्या वेळीच स्थान न मिळालेल्या काही जणांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली होती. आता हेच आमदार पुन्हा होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे डोळे लावून बसले आहेत. त्यासाठी काही जणांनी लॉबिंग करण्यास सुरुवातही केली आहे. या इच्छुकांच्या हाती मंत्रीपद येते की, पुन्हा एकदा बंडाचा झेंडा येईल, हे येत्या काळात स्पष्ट होईल.