घरमहाराष्ट्रराज ठाकरेंना कोकणवासीयांचा ‘मनसे’ पाठिंबा मिळणार का?

राज ठाकरेंना कोकणवासीयांचा ‘मनसे’ पाठिंबा मिळणार का?

Subscribe

कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात शिवसेनेचं प्राबल्य आहे. राज ठाकरे सध्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांमध्ये असून तिथे त्यांनी पक्षबांधणी सुरू केली आहे. परंतु, कोकणात तळागाळापर्यंत मनसेचा कार्यकर्ता पोहोचलेला नसल्याने २०२४ ची निवडणूकही मनसेसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. 

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या कोकण दौर्‍यावर आहेत. आपल्या कोकण दौर्‍यात राज ठाकरे यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील आठ विधानसभा मतदारसंघासाठी चाचपणी केली. या दौर्‍यादरम्यान कोकणवासीयांनी राज ठाकरे यांना भरघोस प्रतिसाद दिला असला तरी राज ठाकरेंना या दौर्‍याचा येत्या निवडणुकीत फारसा फायदा होणार नसल्याचे मत राजकीय विश्लेषकांनी मांडले आहे.

कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात शिवसेनेचे प्राबल्य आहे, परंतु असे असतानाही राज ठाकरे कोकणात आपला पक्ष मजबूत करण्यावर भर दिला आहे. त्यांच्या दौर्‍याला कोकणवासीयांचा भरघोस प्रतिसाद मिळत असल्याचा दावा पक्षाकडून करण्यात येत असला तरी कोकणात तळागाळापर्यंत काम करण्यासाठी मनसेचा जनसंपर्क इतर पक्षांइतका नाही. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये मनसेसाठी हे आव्हानात्मक ठरू शकते. हे ओळखूनच राज ठाकरे सध्या विविध ठिकाणी दौर्‍यावर जात असून पक्ष मजबुतीकरणावर भर देत आहे. शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीचा फायदा मनसेला होण्याची चिन्हे आत्तापर्यंत अनेकांनी वर्तविली आहे, परंतु कोकणात याचा मनसेला होणार हे का, हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेवेळी पक्षाच्या बाजूने जे कार्यकारी मंडळ उभे होते ते आता नाही. मनसेमध्ये सध्या जे पदाधिकारी, कार्यकर्ते आहेत त्यांच्यात अनेक गट आहेत. तळागाळापर्यंत पोहोचण्याकरिता जे कार्यकर्ते आवश्यक आहेत तेही मनसेकडे नाहीत. ही सगळी ताकद शिवसेनेकडे आहे. सध्या शिवसेनेची ही ताकद ठाकरे आणि शिंदे गट, अशी विभागली गेली आहे. पण मनसेकडे मोठ्या संख्येने नव्याने कोणीही आलेले नाही. कोकण दौर्‍याच्या निमित्ताने थोडेफार पक्षप्रवेश झाले असतीलही, पण त्यांची संख्याही फार कमी आहे. त्यामुळे शिवसेनेतील बंडाळी मनसेच्या पथ्यावर पडण्याची फार कमी शक्यता आहे.

कोकणात मनसेची समस्या काय?

- Advertisement -

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कोकणातील कोणत्याच विधानसभा मतदारसंघामध्ये भरीव काम केलेले नाही. उल्लेख करावा, दखल घ्यावी, असे एकही काम रत्नागिरीत मनसेने केलेले नाही, अशी कैफियत अनेकदा तेथील नागरिकांनी स्थानिक पातळीवर मांडलेली आहे. त्यामुळे मनसेला आधी संघटनात्मक कार्य करावे लागणार आहे. पक्षाची धोरणें तळागाळापर्यंत राबवण्याकरिता कार्यकर्ते लागतात. कार्यकर्त्यांना बळ मिळाले तर पक्ष वाढत जातो. एखाद-दुसर्‍या दौर्‍याने काही होत नाही. सातत्याने लक्ष देऊन दौरे केले, कार्यकर्त्यांच्या समस्या सोडवल्या, आर्थिक मदत केली तर पक्ष संघटन मजबूत होईल, असे राजकीय तज्ज्ञ सांगतात.

रत्नागिरी, सिंधुदुर्गात उमेदवार देऊ शकतील, असे उमेदवार मनसेकडे आहेत, परंतु विद्यमान आमदारांच्या पंगतीत त्यांचा फारसा प्रभाव राहणार नाही, असे म्हटले जाते. मनसेचे दक्षिण रत्नागिरीचे जितेंद्र चव्हाण हे चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाच्या शर्यतीत उतरू शकतील. तर, लांजा-साखरपा-राजापूर विधानसभा मतदारसंघासाठी मनसेच्या अविनाश सौंदळकर यांचे नाव चर्चेत आहे. त्यांना शिवसेनेतील राजन साळवी यांच्याविरोधात लढावे लागणार आहे. यांसह पाचही विधानसभा मतदारसंघात प्रस्थापित आमदार असल्याने मनसेला या ठिकाणी कितीसे यश मिळू शकेल, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

कोकणातील समस्यांवर राज ठाकरे बोललेच नाहीत

राज ठाकरेंनी कोकण दौरा केला असला तरीही कोकणातील समस्यांवर त्यांनी भूमिका मांडलीच नाही, असे काही कोकणवासीयांचे म्हणणे आहे. रस्ते विकास, पाणी योजना, सरकारी योजना, पर्यटन, पारंपरिक व्यवसाय आदी बर्‍याच समस्या कोकणवासीयांना भेडसावत आहेत. यावर सकारात्मक चर्चा होणे गरजेचे असताना राज ठाकरेंनी राज्यातील मुद्द्यांनाच कोकण दौर्‍यात लक्ष्य केले. तसेच कोकणातील विवादित असलेल्या रिफायनरी प्रकल्पावरही राज ठाकरेंनी ठाम भूमिका घेतली नाही. रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचा केवळ ओझरता उल्लेख केला. तर टोलमाफीवरूनही टाळाटाळ केल्याचे दिसले. त्यामुळे कोकणात येऊन येथल्या समस्यांवर चर्चा न केल्याने काही कोकणवासीयांमध्ये नाराजी आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -