मध्य रेल्वे वाहतूक विस्कळीत आसनगाव स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटली

Bogus recruitment in railways, Railway Police Commissioner appeals to be careful

मध्य रेल्वेच्या आसनगाव-आटगाव दरम्यान सकाळी दहाच्या सुमारास डाऊन मार्गावरील ओव्हरहेड वायर तुटल्याने वाहतुकीचा तब्बल दोन तास खोळंबा झाला. हे निस्तरत नाही तोच दुपारी एकच्या सुमारास आसनगाव स्थानकातच अप मार्गावरील मालगाडीचे ब्रेक जाम झाले. मालगाडीच्या चाकांमधून धूर येऊ लागल्याने अप मार्गावरील वाहतुकीचा एक तास खोळंबा झाला. यामुळे आसनगाव स्थानकावरील मध्य रेल्वेचे वेळापत्रक अक्षरशः कोलमडून गेले. ओव्हरहेड वायर तुटल्याने डाऊन मार्गावरील दोन लोकल रद्द करण्यात आल्या. तर लांबपल्ल्याच्या गाड्यांचीही रखडपट्टी झाली. तर अप मार्गावर ब्रेक जाम झालेल्या मालगाडीमुळे लांबपल्ल्याच्या गाड्यांना लूप लाईनवरून पुढे काढण्यात आले. आसनगाव स्थानकातच अप आणि डाऊन मार्गावर झालेल्या रेल्वेच्या या बिघाडामुळे गोंधळून गेलेल्या स्टेशन मास्तर यांना संतप्त प्रवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

मध्य रेल्वेच्या डाऊन मार्गावर आसनगाव-आटगाव दरम्यान किमी क्र. ९०/३८ या ठिकाणी सकाळी दहाच्या सुमारास ओव्हरहेड वायर तुटल्याने वाहतूक ठप्प झाली. बाराच्या सुमारास हा तांत्रिक बिघाड दुरुस्त झाल्यानंतर वाहतूक धिम्यागतीने सुरू करण्यात आली. या दरम्यान आसनगाव व कसारा या दोन लोकल रद्द करण्यात आल्या तर लांबपल्ल्याच्या आसनसोल, गोदान, पवन यांसह विशेष गाड्या एक ते दीड तास उशिराने धावत होत्या.

यामुळे प्रवाशांना प्रचंड मनःस्ताप सहन करावा लागला. या दरम्यान मुंबईकडे जाणार्‍या प्रवाशांच्या सोयीसाठी दोन एक्स्प्रेस आसनगाव स्थानकात थांबविण्यात आल्या होत्या. तब्बल दोन तासांनंतर हे प्रकरण निस्तरत नाही तोच अप मार्गावरील मालगाडीच्या इंजिन जवळील चार डब्याचे ब्रेक जाम होऊन त्यामधून धूर येऊ लागल्याने मालगाडी आसनगाव स्थानकात थांबविण्यात आल्याने मालगाडीच्या मागे रखडलेल्या लांबपल्ल्याच्या तीन गाड्या लुपलाईनवरून पुढे काढण्यात आल्या.

आसनगाव स्थानकावरील दोन पॉइंटमनने मालगाडीच्या डब्यांची दुरुस्ती केली. मात्र, पुन्हा झालेल्या सिग्नलच्या काही तांत्रिक बिघाडामुळे आसनगाव स्थानकात आलेल्या ठाणे लोकलचाही काही काळ खोळंबा झाला. तांत्रिक बिघाड दुरुस्त केल्यानंतर लोकलला ग्रीन सिग्नल मिळाला. त्यानंतर एक तासाने सुमारे दोनच्या सुमारास मालगाडी मुंबईच्या दिशेने रवाना झाली. त्यानंतर प्रवाशांसाठी एक विशेष लोकल मुंबईकडे सोडण्यात आली. या दरम्यान संताप अनावर झालेल्या प्रवाशांनी मालगाडी पुढे न काढता एक्स्प्रेस थांबविण्याची मागणी केली होती. मात्र, मालगाडीनेच एक तास खोळंबा केल्याने संतप्त प्रवाशांच्या रोषाला आसनगाव स्टेशन मास्तरला सामोरे जावे लागले.