घरमहाराष्ट्रसत्तेचा हव्यास तुम्हाला होता, आम्हाला नाही

सत्तेचा हव्यास तुम्हाला होता, आम्हाला नाही

Subscribe

चंद्रकांत पाटील यांचे मुख्यमंत्र्यांच्या सत्तेबाबतच्या वक्तव्याला प्रत्युत्तर

अमित शहा यांनी सांगितले म्हणून मुंबई महापालिकेची सत्ता ही शिवसेनेकडे दिली. अन्यथा मुंबई महापालिकेत शिवसेनेचे ८४ आणि भाजपचे ८२ नगरसेवक निवडून आले होते. दोन सहा नगरसेवक हे सहज इथे तिथे गेले असते. आमचे विधानसभेला १०५ आमदार असतानाही शिवसेनेने ५६ आमदार असतानाही हुशारीने दोन पक्षांसोबत मिळून सरकार स्थापन केले. त्यामुळे सत्तेचा हव्यास तुम्हाला होता, आम्हाला नाही, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सत्तेबाबतच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले आहे.

स्वबळावर सत्ता आणणे प्रत्येक पक्षप्रमुखाचे स्वप्न असलेच पाहिजे. नसेल तर त्या पदासाठी तो नालायक आहे. राज्यात कुणालाही स्वबळावर सत्ता मिळेल, अशी परिस्थिती नाही. आमची युती वैचारिक पातळीवर झाली होती. पण आता त्यांची वैचारिक पातळी पाताळात गेलीय का तेच कळत नाही. कुणाबरोबरही युती करायची याबाबत त्यांचाच कित्ता आम्ही गिरवला, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजप-शिवसेना युतीवरून सेनेला वारंवार लक्ष्य करणार्‍या भाजपला गुरुवारी टोला लगावला होता. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याचा चंद्रकांत पाटील यांनी समाचार घेतला. मुंबई महापालिकेत आम्ही उपमहापौरही दिला नाही. तसेच स्थायी समिती किंवा कोणत्याच समितीची मागणी केली नाही. अमितभाईंनी सांगितले म्हणून मुंबई महापालिकेची सत्ता शिवसेनेला दिली, असे सांगत चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला मुंबई महापालिकेतील सत्तेबाबतची आठवण करून दिली.

- Advertisement -

मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्याप्रकरणीही चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. एखाद्या कर्मचार्‍याला अटक झाल्यानंतरही त्याला राजीनामा द्यावा लागतो. हा नियम राज्य सरकारमधील एका मिनिस्टरने फॉलो करायला नको का? त्यामुळे येत्या दिवसांमध्ये आंदोलन आम्ही आणखी तीव्र करणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. मंत्रालयाशेजारी महात्मा गांधींच्या पुतळ्याला मराठा, ओबीसी, एससी समाज तसेच संभाजीराजे अशा कोणालाच परवानगी देण्यात येत नाही. मग महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ केंद्रीय तपास यंत्रणेविरोधात स्वतः सत्तेत असतानाही रस्त्यावर कसे काय बसते? तुम्हाला परवानगी कशी काय मिळते, याचीही चौकशी व्हायला हवी. हे मंत्रिमंडळ बेकायदेशीररित्या आंदोलनाला बसले का? यांच्यासाठी आंदोलन करण्यासाठी कलम लागणार का? असाही सवाल त्यांनी केला.

शिवसेनेचे संजय राठोड यांच्या आंदोलनासाठी भाजपने आंदोलन केल्यानंतर एका दिवसात राठोड यांनी राजीनामा दिला. अनिल देशमुख यांचीही सीबीआयने चौकशी केली असता त्यांनीही तत्काळ राजीनामा दिला. मग नवाब मलिकांचा राजीनामा का नाही? १९९३ च्या बॉम्बस्फोटानंतरची बाळासाहेब ठाकरे यांची भाषणे आम्ही दाखवणार आहोत. शिवसेनेने आपली भूमिका हिंदुत्वाच्या बाजूने त्यावेळी घेतली होती. आता उद्धवजी ती भूमिका घेणार का? असाही सवाल त्यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -