घरमहाराष्ट्रआमदार भालकेंकडील मुख्यमंत्र्यांच्या फराळाने काँग्रेसवर एकादशी?

आमदार भालकेंकडील मुख्यमंत्र्यांच्या फराळाने काँग्रेसवर एकादशी?

Subscribe

गोवा-कर्नाटकानंतर महाराष्ट्रातही काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर असण्याच्या चर्चेला ऊत

कर्नाटकातील काँग्रेसच्या आमदारांनी दिलेल्या राजीनाम्याचे नाट्य सुरू असतानाच नुकताच गोव्यातील काँग्रेसच्या १० आमदारांनी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही काँग्रेस पक्ष फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज पंढरपूरला महापुजेला गेलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूरचे काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्याकडे पाहुणचार घेतल्याने आ. भालके यांच्यासह काही काँग्रेस आमदार भाजपाच्या गळाला लागणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

आगामी काळात राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काही काँग्रेसचे आमदार भाजपच्या गळला लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्या चिरंजीवाने भाजपात प्रवेश केला होता, तर निवडणुकीनंतर आमदारकी व विरोधीपक्षनेतेपदाचा राजीनामा देत विखे पाटील यांनी स्वत: भाजपात प्रवेश केला आणि नंतर झालेल्या मंत्रिमंडल विस्तारात गृहनिर्माणमंत्री पद प्राप्त केले. त्यांच्यासोबत आणखी काही काँग्रेस आमदार भाजपात जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारत भालके यांच्याकडे एकादशीचा फराळ केल्याने या चर्चेला पुन्हा जोर आला आहे.

- Advertisement -

परंपरेप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सपत्नीक पंढरपूरच्या विठ्ठलाची पूजा केली. त्यानंतर वारकऱ्यांच्या कार्यक्रमात ते सहभागी होऊन दुपारी एकादशीच्या फराळासाठी पंढरपूरचे आमदार भारत भालके यांच्याकडे दाखल झाले. भालके यांनीही त्यांचा यथोचित पाहुणचार केल्याचे समजते. यावेळी मुख्यमंत्री आणि भालके यांच्यात काही चर्चाही झाल्याचे समजते मात्र त्याचा तपशील समजू शकलेला नाही. मात्र मुख्यमंत्र्यांच्या या भेटीने राजकीय चर्चेला उधाण आले असून ही फराळी एकदशी काँग्रेसवर येऊन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राज्यातील काँग्रेस पक्ष आणखी फुटू शकतो अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -