घरमहाराष्ट्रजयपूर ते १० जनपथ!

जयपूर ते १० जनपथ!

Subscribe

काँग्रेस हायकमांड केंद्रस्थानी

जोवर शिवसेना भाजपशी काडीमोड घेत नाही, तोवर सेनेला सत्तास्थापनेसाठी पाठिंबा देण्याविषयी चकार शब्द उच्चारायचा नाही, अशी ठाम भूमिका घेणार्‍या दोन्ही काँग्रेसनी दोन दिवसांपूर्वी सेना-भाजपची युती तुटल्यानंतर तसेच राज्यपालांनी शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिल्यानंतर तात्काळ सक्रिय झाले. मागील दोन दिवसांपासून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सेनेला पाठिंबा देण्याविषयी जयपूरमधील हॉटेलात ठेवलेल्या ४४ आमदारांशी गुफ्तगू करत होते, मात्र सोमवारी जशी राज्यपालांनी सेनेला दिलेली मुदत संपत आली, तशी काँग्रेसच्या नेत्यांनी १० जनपथ येथे धाव घेतली. राज्यात शिवसेनेला पाठिंबा देण्याविषयी अखेरच्या क्षणापर्यंत काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी, ज्येष्ठ नेते अहमद पटेल, महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत मॅरेथॉन बैठका सुरू होत्या. परंतु काँग्रेसकडून पाठिंब्याविषयी झालेल्या दिरंगाईमुळे आपसूकच पवार यांच्या सिल्व्हर ओकनंतर सोनिया गांधींचे निवासस्थान १० जनपथ हे केंद्रस्थानी आले.

राज्यपालांची मुदत संपूनही काँग्रेसने अखेरपर्यंत सेनेला पाठिंब्याचे पत्र दिले नाही, त्यामुळे सोनिया गांधी यांनी अप्रत्यक्षपणे ‘मातोश्री’ची कोंडी केल्याचे समजते. १० जनपथ येथून बैठक आटोपल्यानंतर खर्गे यांनी आम्ही मंगळवार, १२ नोव्हेंबर रोजी मुंबईत येऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेऊ असे सांगितले, तर शरद पवार यांनीही आमची काँग्रेससोबत आघाडी असल्याने आम्ही दोन्ही पक्ष एकत्र चर्चा-विनिमय करूनच पाठिंब्याविषयी निर्णय घेऊ, असे सांगत सस्पेन्स कायम ठेवत शिवसेनेला अधांतरीत ठेवले.

- Advertisement -

सोमवारी संपूर्ण दिवस काँग्रेस हायकमांडच्या भोवती राज्याचे राजकारण फिरत राहिले. शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी राज्यपालांनी दिलेली दोन दिवसांची मुदत सोमवारी संध्याकाळी ७.३० वाजता संपणार होती. त्यामुळे येनकेन प्रकारेण काँगे्रसने पाठिंबा द्यावा, याकरता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कसोशीने प्रयत्न करत होते. या सर्व घडामोडीत शिवसेनेचे ‘सरसेनापती’ खासदार संजय राऊत यांच्या छातीमध्ये अचानक दुखू लागल्याने त्यांना तात्काळ लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याने त्यांच्या सर्व जबाबदार्‍या उद्धव ठाकरे यांनी खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब यांच्यावर सोपवली. त्यानुसार खासदार अनिल देसाई यांनी दिल्लीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्याशी दीर्घकाळ चर्चा केली. त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही मातोश्री येथून अहमद पटेल यांना फोन केला.

तसेच १० जनपथ येथे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत अहमद पटेल, खर्गे यांच्यासह राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्या बैठका झाल्या. त्यावेळी शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत हायकमांडमध्ये एकमत होत नव्हते. संध्याकाळपर्यंत काँग्रेस हायकमांड निर्णयाप्रत येत नव्हते. कारण शिवसेनेला पाठिंबा देण्यावर स्वत: राहुल आणि प्रियांका गांधी यांचा विरोध होता. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधी यांनाही फोन केला.

- Advertisement -

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने याआधीच शिवसेनेला अप्रत्यक्ष पाठिंबा दिला होता. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी लागणारा बहुमताचा आकडा हा काँग्रेसच्या पाठिंब्याशिवाय पूर्ण होणार नसल्यामुळे संध्याकाळपर्यंत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांसह उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे या सर्वांच्या नजरा या काँग्रेस हायकमांडच्या निर्णयाकडे लागल्या होत्या. त्यामुळे आपसूकच राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी तिसर्‍या क्रमांकावरील काँग्रेस पक्ष आला होता. काँग्रेसची विचारधारा आणि शिवसेनेची विचारधारा ही परस्पर विरोधी आहे. त्यामुळे सेनेला पाठिंबा दिल्यास काँग्रेसचे राजकीय नुकसान होऊ शकेल, असा मतप्रवाह काँग्रेस हायकमांडमधील एका गटाचा होता. त्यामुळे सोनिया गांधी अंतिम निर्णयापर्यंत पोहोचू शकत नव्हत्या. त्यांनी राज्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचीही मते समजून घेतली.

सरकारला बाहेरुन पाठिंबा द्यायचा की, सत्तेत सहभाग घ्यायचा, यावर विचारविनिमय केला. मात्र अखेरपर्यंत काँग्रेस हायकमांड निर्णयाप्रत आले नाही. अखेर शेवटचा पाऊण तास बाकी असताना युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते एकनाथ शिंदे, शिवसेना नेते सुभाष देसाई, खासदार विनायक राऊत, सरचिटणीस आदेश बांदेकर हे सर्व जण राजभवनात दाखल झाले होते. त्यांनी सत्तास्थापनेचा दावा केला. मात्र उशिरापर्यंत काँग्रेसकडून सेनेला पाठिंब्याचे पत्र दिले गेले नाही. अखेर राज्यपालांनी दिलेली मुदत संपल्यानंतर राजभवनात काँग्रेसच्या पाठिंब्याच्या पत्रासाठी ताठकळत बसलेल्या सेनेच्या नेत्यांनी राज्यपालांना दोन दिवसांची मुदत मागितली, परंतु राज्यपालांनी साफ नकार दिल्यावर सेना नेत्यांनी सत्तास्थापनेचा दावा कायम ठेवत राजभवनातून रिकाम्या हाती परतावे लागले.

शिवसेनेचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला असला तरी दोन्ही काँग्रेसने सत्तेत अपेक्षित वाटा मिळालाच पाहिजे, अशी आग्रही भूमिका घेतल्याने अखेर मुख्यमंत्रीपद हे शिवसेनेकडे असेल. तर दोन्ही काँग्रेससाठी दोन उपमुख्यमंत्री पदे निर्माण केली जातील, तसेच दोन्ही काँग्रेसला १२-१२ मंत्रीपदे देण्याचा शब्द शिवसेनेकडून दिला गेला, मात्र काँग्रेस हायकमांडने शेवटपर्यंत सेनेला पाठिंबा देण्याविषयी अंतिम निर्णय घेतला नाही. त्यामुळे सत्तास्थापनेचे हे त्रांगडे कायम राहिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -