घरमहाराष्ट्रत्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीला काँग्रेसला विरोध

त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीला काँग्रेसला विरोध

Subscribe

प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत दोन सदस्यीय प्रभागाचा ठराव

आगामी महापालिका निवडणुकीत तीन सदस्यांचा एक प्रभाग कऱण्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाला काँग्रेसने विरोध केला आहे. महापालिकेत तीन ऐवजी दोन सदस्यांचा प्रभाग असावा अशी मागणी काँग्रेसने केली असून गुरुवारी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीत तसा ठराव करण्यात आला. त्यामुळे बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीवरून आघाडीतील मतभेद समोर आले आहेत.

राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत नागरी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मुंबई महापालिका आणि नगर पंचायत वगळून अन्य महापालिका तसेच नगर पालिकेत बहुसदस्यीय प्रभाग पद्धत लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मुंबई वगळता अन्य महापालिकेत तीन तर नगरपालिकेत दोन सदस्यांचा एक प्रभाग असणार आहे.

- Advertisement -

प्रदेश काँग्रेसच्या आज झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत आघाडी सरकारच्या या निर्णयाला विरोध करण्यात आला. महापालिकेत दोन सदस्यांचा प्रभाग असावा अशी मागणी करत तसा ठराव बैठकीत मंजूर करण्यात आला. त्यामुळे प्रभाग पद्धतीवरून काँग्रेसची नाराजी उघड झाली आहे.

आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. परंतु काँग्रेसच्या बहुसंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा त्याला विरोध आहे. त्यामुळे तीन ऐवजी दोन सदस्यांचा प्रभाग असावा, अशी काँग्रेसची भूमिका आहे. यासंबंधीचा ठरावही कार्यकारिणीत एकमुखाने मंजूर केला असून याबाबत मुख्यमंत्र्यांना विनंती केली जाणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बैठकीनंतर सांगितले.

- Advertisement -

दरम्यान, राज्यात काँग्रेस पक्षाला क्रमांक एकचा पक्ष बनविण्यासाठी सर्वांनी मिळून एकत्रितपणे जातीय, धर्मांध शक्तींविरोधात पूर्ण ताकतीनिशी लढून महाराष्ट्रात पुन्हा काँग्रेस पक्षाला गतवैभव मिळवून देण्याचा ठराव कार्यकारिणीत एकमताने मंजूर करण्यात आल्याची माहिती पटोले यांनी दिली. राज्यातील महिलांच्या सुरक्षेसाठी आंध्र प्रदेशातील शक्ती कायद्याच्या धर्तीवर राज्यात कायदा करण्याचा ठरावही कार्यकारिणीत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -