घरमहाराष्ट्रपालीच्या अंबा नदीवरील नवीन पुलाचे काम सुरू

पालीच्या अंबा नदीवरील नवीन पुलाचे काम सुरू

Subscribe

प्रवास होणार सुलभ, सुरक्षित

पाली-वाकण मार्गावरील अंबा नदीवर नवीन पुलाचेे काम सुरू झाले आहे. या नवीन पुलाची रूंदी 16 मीटर असून, उंची जुन्या पुलापेक्षा 5 ते 6 फूट अधिक असणार आहे. भार पेलण्याची क्षमता तब्बल 75 टन म्हणजे जुन्या पुलापेक्षा साडेतीन पट अधिक असल्याने वाहनचालकांसह प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दरवर्षी मुसळधार पावसामुळे अंबा नदी दुथडी भरून वाहते. या दिवसांत पुलावरून नेहमी पाणी वाहत असल्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबते. तसेच पुलावरील सिमेंटचे आणि लोखंडी संरक्षक कठडे (रेलिंग) वाहून जातात. तसेच क्षमतेपेक्षा अधिक वजनाची वाहने जात असल्याने पुलावर पडणार्‍या खड्ड्यांमुळे पूल वाहतुकीसाठी असुरक्षित झाला आहे. परिणामी पुलावरून प्रवास करणे कमालीचे धोकादायक झाले आहे. नवीन पुलामुळे आता येथून प्रवास करणे सुरक्षित आणि सुलभ होणार आहे. सध्या भार पेलण्याची क्षमता 19 टन असताना तब्बल ६० किंवा त्याहून अधिक टन क्षमतेचे ट्रक, ट्रेलर वाहतूक करीत आहेत.

- Advertisement -

दरम्यान, खोपोली-पाली-वाकण मार्गावरील जांभुळपाडा आणि भालगुल येथील पुलांचीदेखील दुरवस्था झाली असून, दोन्ही पूल धोकादायक अवस्थेत आहेत. मात्र या दोन्ही पुलांच्या जागी आता नवीन आणि अंबा नदी पुलाप्रमाणेच पूल बांधले जाणार आहेत. त्यांचेही काम या आठवडाभरात सुरू होणार असल्याची माहिती एमएसआरडीसीचे उप अभियंता सचिन निफाडे यांनी दिली. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणे सुखकर होणार आहे. हा मार्ग मुंबई-गोवा, तसेच मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग आणि एक्स्प्रेस वेला जोडला गेला आहे.

तीनही पुलांचे काम 9 महिन्यांत म्हणजे सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण होईल. सुरुवातीस 8 मीटर रूंदीचे पूल एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण होतील. त्यांनतर जुने पूल तोडून त्याजागी दुसरे 8 मीटरचे पूल बांधण्यात येतील. दर्जेदार आणि योग्य वेळेत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
-सचिन निफाडे, उपअभियंता, एमएसआरडीसी

- Advertisement -

खोपोली-वाकण मार्गावरील तीनही पूल कमकुवत होऊन वाहतुकीसाठी असुरक्षित झाले आहेत. पावसाळ्यात तर पुलांवरून पाणी गेल्यामुळे प्रवासी, विशेषतः विद्यार्थ्यांची खूप गैरसोय होते. त्यामुळे नवीन पुलांची निर्मिती वेळेवर होणे गरजेचे आहे. सर्व पूल भक्कम आणि दर्जेदार असावेत.
– प्रकाश पालकर, कार्याध्यक्ष, सुधागड वंचित सामाजिक विकास संस्था

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -