घरताज्या घडामोडीCruise Drug Bust : नवाब मलिकांच्या आरोपावर फ्लेचर पटेल, लेडी डॉनचे प्रत्युत्तर

Cruise Drug Bust : नवाब मलिकांच्या आरोपावर फ्लेचर पटेल, लेडी डॉनचे प्रत्युत्तर

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आणखी एक खळबळजनक दावा केला आहे. एनसीबी अधिकारी समीर वानखेडे ड्रग्ज प्रकरणात कारवाई करतात तेव्हा एकच पंच वारंवार कसा? असा प्रश्न नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच फ्लेचर पटेल आणि भाजपचे काय कनेक्शन आहे असा सवाल देखील नवाब मलिक यांनी केला होता. मलिकांच्या आरोपावर लेडी डॉन आणि फ्लेचर पटेल यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ड्रग्जमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी एनसीबीच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहोत तर नवाब मलिकांना मिर्ची का झोंबली? असा सवाल फ्लेचर पटेल यांनी केला आहे. तसेच लेडी डॉन यांनीही नवाब मलिकांच्या आरोपावर प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादी नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ड्रग्ज प्रकरणातील कारवाईवरुन पुन्हा एकदा भाजप आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला आहे. नवाब मलिकांनी यापुर्वी किरण गोसावी, मनीष भानुशाली आणि मोहित कम्बोज यांची नावे घेतली होती. तर आता एनसीबीच्या कारवाईत सतत पंच असलेले फ्लेचर पटेल आणि लेडी डॉन कोण असा सवाल केला आहे. तसेच फ्लेचर पटेलचे भाजपशी, एनसीबीशी काय संबंध आहेत असा देखील सवाल केला होता यावर फ्लेचर पटेल आणि लेडी डॉन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

फ्लेचर पटेल यांचा मलिकांवर हल्लाबोल

नवाब मलिक यांनी आरोप केलेले फ्लेचर पटेल हे सैनिक फेरडरेशनचे मुंबई अध्यक्ष आहेत. फ्लेचर पटेल यांनी म्हटलं आहे की, कारगिल दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात एनसीबी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांचा गौरव करण्यात आला होता. समीर वानखेडे चांगले अधिकारी आहेत. ते चांगले काम करत आहेत. माजी सैनिकांचे कर्तव्य आहे की, महाराष्ट्र ड्रग्जमुक्त करणे आणि समीर वानखेडे सारख्या अधिकाऱ्यांना मदत करणे. तसेच मी संघटनेतर्फे वानखेडेंना पूर्ण सहकार्य करणार असल्याचे फ्लेचर पटेल यांनी म्हटलं आहे.

मलिकांना का मिर्ची लागली

कोरोना काळात माजी सैनिकांनी एक टीम बनून महाराष्ट्र सरकारला मदत केली होती. तेव्हा माजी सैनिक कोरोना योद्धा कसे झाले हे नवाब मलिक यांनी विचारले नाही परंतु आता सैनिक एनसीबीचे योद्धे बनले आहेत तर नवाब मलिकांना आता मिर्ची का लागली असा प्रश्न फ्लेचर पटेल यांनी केला आहे. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे माझे आदर्श आहेत. सलमान खान, शाहरुख खानला का आदर्श मानायचे? ते फक्त सिनेमातील हिरो आहेत. ड्रग्जमुक्त करण्यासाठी एनसीबीसोबत मैदानात या. मला काही भीती नाही. माझ्या मागे पुढे कोण नाही त्यामुळे मी घाबरणार नाही. जोपर्यंत वर्दी आहे तोपर्यंत एनसीबीसोबत राहणार आणि ड्रग्जमुक्त करण्यासाठी झटत राहणार असे फ्लेचर पटेल यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

लेडी डॉन कोण?

राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांनी ज्या लेडी डॉनचा उल्लेख केला त्या लेडी डॉन या समीर वानखेडे यांची मोठी बहिण आहे. तसेच त्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्या महिला सशक्तीकरण आणि वाकासासाठी काम करतात यामुळे त्यांना लेडी डॉन म्हटलं जाते. लेडी डॉन यांनीदेखील मलिकांवर हल्लाबोल केला आहे. मलिकांच्या आरोपांवर उत्तर द्यायची काही गरज नाही. कोणाच्याही परिवारातील महिलांवर ड्र्ग्जच्या कारवाई प्रकरणात आरोप करणे हे अशोभनीय आहे. तुम्ही पहिले माहिती काढा, कोणी काय बोले, काय सांगितले. सैनिक फेडरेशन मुंबई अध्यक्ष फ्लेचर पटेलांवर मलिकांनी आरोप केले आहेत. तसेच पटेल माझ्या भावासारखे असल्याचे लेडी डॉन यांनी म्हटलं आहे.

नवाब मलिकांवर अब्रुनुकसानीचा दावा करणार

माझी एक एनजीओ आहे. ड्र्ग्ज प्रकरणात चर्चा होत नाही आहे. परंतु चांगले काम करणाऱ्यांवर आरोप होत आहे. जे मोठे लोकं पकडले गेले आहेत त्यांच्यावर काही चर्चा होत नाही आहे. ज्यांच्या नातेवाईकांना पकडले आहे ते बोलणारच असे लेडी डॉन यांनी म्हटलं आहे. कारगील दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात एनसीबी आणि सैनिक फेडरेशन मुंबई यांनी ठरवले की ड्रग्ज कारवाईमध्ये एकत्रपणे कारवाई करण्यात येईल. महाराष्ट्र ड्रग्जमुक्त करण्यासाठी दोघेही सोबत कारवाई करतात असेही लेडी डॉन यांनी सांगितले आहेत. लेडी डॉन म्हटल्याबाबत मी नवाब मलिकांवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहे. मी शांत बसणार नाही. फ्लेचर माजी सैनिक आहेत. आमच्यावर आरोप करण्यात येत आहेत. आम्ही मानहाणीचा दावा करणार आहे. आम्ही सामान्य माणसं असून आम्ही संविधानावर विश्वास ठेवतो.


हेही वाचा : Cruise Drug Bust : फ्लेचर पटेलचे भाजपशी कनेक्शन काय ? नवाब मलिकांचा सवाल


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -