घरमहाराष्ट्रCyclone Gulab : राज्यात पूरस्थिती, वीज कोसळून १३ जण ठार, बचावकार्यात ५६०...

Cyclone Gulab : राज्यात पूरस्थिती, वीज कोसळून १३ जण ठार, बचावकार्यात ५६० जणांची सुटका

Subscribe

मुंबई, पालघर, कोकण, मराठवाड्यासह संपूर्ण राज्याला अतिमुसळधार पावसाने झोपडून काढले आहे. गेल्या २४ तासांत पालघर, नाशिक, ठाणे आणि मुंबईसह, उपनगरात मुसळधार पावसाने कहर केला आहे. यातच मराठवाड्यात अतिमुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पूर आणि वीज कोसळण्याच्या घटनांमध्ये आत्तापर्यंत १३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर ५६० हून अधिक नागरिकांना एनडीआरएफच्या टीमने वाचवले आहे. रविवारपासून सुरु असलेल्या पावसामुळे आत्तापर्यंत दोनशेहून अधिक जनावरे वाहून गेली आहेत. तर अनेक घरांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.

मुंबईतही मंगळवारपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील २४ तासांत कोकण भागात, मराठवाडा, मुंबई आणि किनारपट्टी भागात ‘अतिवृष्टी’ होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात पावसाने प्रचंड नुकसान केला आहे. तर औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, बीड, जालना आणि हिंगोली या आठ जिल्ह्यांत मुसळधार पावसाने हैदोस घातला आहे,

- Advertisement -

बीड जिल्हा पाण्याखाली

मांजरा धरणाच्या लगतच्या भागात मुसळधार पावसामुळे पाण्याची पातळी वाढल्यानंतर अधिकाऱ्यांनी मंगळवारी धरणाचे सर्व १८ दरवाजे उघडले. यामुळे बीड जिल्ह्यातील काही गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर शेजारच्या जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील दोन दिवस राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. यात मराठवाड्यातील औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, बीड, जालना आणि हिंगोली या आठ जिल्ह्यांचा समावेश आहे.

गेल्या ४८ तासांत ६ जिल्ह्यांमध्ये १० नागरिकांचा मृत्यू

विभागीय आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले की, या आठ जिल्ह्यांच्या १८० मंडळांमध्ये ६५ मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे धरणातील पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे पाणी काढण्यासाठी अनेक धरणाचे दरवाजे उघडण्यात आले, ज्यामुळे बीड आणि लातूर जिल्ह्यातील मांजरा नदीकाठच्या गावांमध्ये पूर आलाय. आयुक्त कार्यालयाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, गेल्या ४८ तासांमध्ये सहा जिल्ह्यांमध्ये १० लोकांचा मृत्यू झाला आहे. बीडमध्ये तीन, उस्मानाबाद आणि परभणीमध्ये प्रत्येकी दोन आणि जालना, नांदेड आणि लातूरमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

गेले दोन दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे दोनशेहून अधिक जनावरे मरण पावली आहेत. तर २८ घरांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे ओढावलेल्या पुरास्थितीमुळे आठ जिल्ह्यांमधील उभी पिकं नष्ट झाली आहेत. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी बीड जिल्ह्यातील पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “जलसंपदा विभाग कालपासून परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवून आहे आणि आम्ही नुकसान कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत.”

मुंबईला यलो अलर्ट

मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, मुंबईत मुसळधार पाऊस असूनही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याची घटना घडलेली नाही. सार्वजनिक वाहतूक सेवा देखील सामान्यपणे सुरू आहेत. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार म्हणाले, “उपनगरीय आणि घाट विभागात मुसळधार पाऊस पडत आहे. परंतु, लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्या वेळापत्रकानुसार धावत आहेत.”

आयएमडीने बुधवार मुंबईमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. ज्यामुळे मुंबईत विजांच्या कडकडाटासह, वेगवान वारे वाहणार आहे. तर वादळजन्य परिस्थिती निर्माण होत वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -