घरमहाराष्ट्रनाशिकबोलठाणसह घाटमाथा परिसरात जोरदार पाऊस

बोलठाणसह घाटमाथा परिसरात जोरदार पाऊस

Subscribe

पावसाने पिकांची वाताहत

बोलठाण ,नांदगाव तालुक्यातील बोलठाणसह घाटमाथ्यावर रात्री अकरानंतर सुरू झालेल्या पावसाने पहाटेपर्यंत जोरदार हजेरी लावल्याने परिसरातील कपाशी पिकांसह सर्वच पिकांची वाताहत झाली आहे. मागील वर्षी तोरणा व पावसाचे अत्यल्प प्रमाण यामुळे संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना अति पावसाने पुन्हा एकदा संकटात टाकत भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे.

हातातोंडाशी आलेला घास डोळ्यासमोर पाण्यात वाहून जात असताना शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.घाटमाथ्यावर झालेल्या पावसाने कपाशी, बाजरी, कांदा, सोयाबीन, मका पिकांचे मोठे नुकसान झाले असून, त्याच बरोबर रस्ते, पूल, घरांची पडझड होत नुकसान झाले आहे. बोलठाण गावात जाणार्‍या पुलावर दिवसभर पाणी वाहत असल्याने पूल कोसळतो की काय? अशी अवस्था झाली आहे. जागोजागी पाणी साचल्याने रस्ता की डबके असे चित्र पहावयास मिळत आहे. जातेगाव खरवळी नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने संपर्कही तुटला होता. त्यामुळे पावसाळ्याआधी या गोष्टींकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. रात्रीपासून दिवसभर सुरू असलेल्या पावसाच्या पाण्यामुळे संपूर्ण परिसराची वाताहत झाली आहे

- Advertisement -

कापूस, कांदा, मका पाण्यात

 येवला तालुक्यातील उत्तर-पूर्व भागातील राजापूर, ममदापूर, देवदरी आदी अनेक गावांना उत्तरा नक्षत्राचा पाऊस चांगलाच झोडपतोय. पावसाने उभे असलेले मका, कापूस, कांदे, सोयाबीन, भुईमूग पिकाची पुरती वाताहत केली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.पिके गेल्या अनेक दिवसांपासून पाण्यात असल्यामुळे कांदा पीळ मारून व मर रोगाने नष्ट होण्याच्या मार्गांवर आहे, कापूस पीक अनेक दिवसांपासून पाण्यात आहे. त्यामुळे पूर्णपणे लाल पडून उद्ध्वस्त होण्याच्या मार्गांवर आहे. हाताशी आलेले पीक पाण्यात गेले आहे.

आधीच मजुरीचे दरही नियंत्रणात राहिलेले नाही, मजुरीचे वाढलेले दर, कधी अतिवृष्टी, कधी अनेक दिवस पावसाची उघडीप, कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ. त्यामुळे शेती करावी कि नाही असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे. पिकाचा पेरणीपासून ते काढणीपर्यंतचा एकूण खर्च लक्षात घेता सर्व खर्च बियाणे, किटकनाशके, खते, पाणी आणि मजुरी यामध्येच जात असल्याने बळीराजा मेटाकुटीला आलाय. उभे पिके पाण्यात पोहतांना बघून बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -