घरमहाराष्ट्रअर्थचक्र विस्कटले; चिंता पुढील १० वर्षांची...

अर्थचक्र विस्कटले; चिंता पुढील १० वर्षांची…

Subscribe

चक्रीवादळाच्या तडाख्याने रायगडसह शेजारच्या रत्नागिरी जिल्ह्यातील अर्थचक्र विस्कटले आहे. करोनामुळे आधीच संकटात सापडलेले अनेक व्यवसाय वादळामुळे अधिकच अडचणीत आले आहेत. गेले वर्षभरात पाऊस, अधूनमधून आलेली वादळे यामुळे मच्छीमारी व्यवसाय डबघाईला आला आहे. त्यात चक्रीवादळाने आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. आता सरकारी नियमाप्रमाणे हा व्यवसाय जूनमध्ये बंद होऊन थेट नारळी पौर्णिमेपर्यंत किंवा त्यानंतर बोटी पुन्हा मच्छीमारीसाठी समुद्रात जातील. मुरुड, दिघी आणि अन्य ठिकाणी कितीतरी बोटींची नासधूस झाली असून, काही बोटी डागडुजी पलीकडे गेल्याचे सांगितले जाते.

नुकसान झालेल्या अलिबाग, मुरुड आणि श्रीवर्धन तालुक्याचा पर्यटन हा प्राण! या ठिकाणी दरवर्षी हजारो देशी-विदेशी पर्यटक भेट देत असतात. यामुळे हॉटेल, निवासी जागा यातून मोठी आर्थिक उलाढाल होत असते. तेथील कुटीर उद्योगही भरभराटीला येत आहेत. दिवेआगर, अलिबाग तालुक्यातील नागाव, वरसोली यासह अनेक ठिकाणी समुद्र किनारी असणार्‍या वाड्यांतून (नारळ, आंबा, सुपारी, केळी, सुरू अशासारख्या वृक्षराजींची बाग) छोटे-छोटे निवासी तंबू, खानपान सुविधा पुरवले जात असल्याने एरव्ही शांत असलेल्या वाड्या बोलत्या झाल्या आहेत. चक्रीवादळाच्या दणक्यात तेथे आता समुद्राच्या लाटांखेरीज कसलाही आवाज नाही. जे विविध प्रकारचे पक्षी या वाड्यांतून किलबिलाट करीत होते त्यांचाही आवाज थांबलेला आहे, कारण त्यांच्या हक्काचे घरच त्यांना कुठे दिसत नसल्याने त्यांचा मुक्काम आता इतरत्र हलला आहे.
सगळीकडे सन्नाटा पसरलेला असताना दिवसभरात सरकारी वाहनांच्या वर्दळीचा होणारा आवाज सोडला तर बाकी वर्दळ ठप्प झालेली आहे. काही ठिकाणी तर वीज पुरवठाही सुरू झालेला नाही. मुरुड फेस्टिव्हलमध्ये तेथील पर्यटनाचा जागतिक स्तरावर बोलबाला होईल म्हणून अनेकदा भाकिते करून झाली. मुरुड तालुका जागतिक पर्यटनाच्या नकाशावर झळकला तर कुणाला आनंद होणार नाही, सर्वच आनंदित होतील. परंतु याच ठिकाणी वादळानंतरच्या १३ दिवसांनीही वीज पुरवठा सुरू झालेला नाही. श्रीवर्धन तालुक्याचीही हीच स्थिती आहे. नेते येतायत आणि भरभरून आश्वासन देत निघून जातात. मुरुड तालुक्यातील एका ज्येष्ठ पत्रकाराने प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना नेत्यांच्या दौर्‍याचे वर्णन ‘पर्यटन यात्रा’ असे केले आहे. नुकसानाची व्याप्ती मोठी असताना येणारे नेते मांडवा (ता. अलिबाग) ते श्रीवर्धन व्हाया मुरुड असा प्रवास अवघ्या ६ ते ७ तासांत उरकून निघून जात आहेत. प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी पाहणीचे भाग वाटून घेतल्यासारखे दौरे होत आहेत.

- Advertisement -

यावेळी नुकसान भरपाई देताना काही निकष बदलण्यात आले आहेत. शेतीसाठी पूर्वी १८ हजार रुपये हेक्टरी मिळत असत, ते थेट ५० हजार करण्यात आले आहेत. ज्यांच्या घरांचे पूर्ण नुकसान झाले त्यांना ९५ हजार ते १ लाखापर्यंतची मदत केली जात असे, ती आता दीड लाखापर्यंत नेण्यात आली आहे. अंशतः नुकसान झालेल्या घरांसाठी ६ ते १५ हजारापर्यंत मदत केली जात आहे. भांडी आणि कपड्यांसाठी या अगोदर प्रत्येकी अडीच हजार रुपये मिळत असत, तो आकडा प्रत्येकी ५ हजारापर्यंत वाढविण्यात आला आहे. खर तर नुकसानीचे प्रमाण पाहिले तर ही मदत जुजबी आहे. सध्या 10 हजार नुकसान झालेल्यांना १५ हजार दिले जात आहेत आणि ३५ ते ४० हजार नुकसान झालेल्यांनाही १५ हजारच दिले गेल्याकडे मुरुड तालुक्यातील एका नुकसानग्रस्ताने लक्ष वेधले आहे. ज्यांनी कर्ज काढून किंवा पै-पै साठवून त्यातून घरे बांधली त्यांच्यापुढे आता या मदतीतून नेमके काय करायचे, असा सवाल आहे.

सर्वात मोठा विनोद आहे तो बागायत नुकसानीच्या मदतीबाबतचा. हेक्टरी (अडीच एकर) १८ हजारात ३२ हजाराची भर पडली असली तरी कोकणातील शेती किंवा बागायती ही गुंठ्यामध्ये अधिक असल्याने प्रति गुंठा ५०० रुपयांची मदत होते. दिवेआगरचे कृष्णकांत तोडणकर सांगतात की, नारळाची दोन रोपे लावायची म्हटले तरी ५०० रुपये पुरणार नाहीत. अनेक बागायतदारांच्या डोक्यावर कर्ज आहे. ते अशा तुटपुंज्या मदतीत काय करतील? मच्छीमार बांधवांचीही हीच अवस्था आहे. एक बोट तयार करायला ५ ते ७ पासून 12 लाखापर्यंतचा खर्च असतो. आता येणार्‍या मदतीत बोटी नव्याने कशा बांधायच्या हा आमच्यापुढील मोठा पेच असल्याचे मच्छीमार बांधव सांगतात. श्रीवर्धन तालुक्यातील दिघी येथील रामचंद्र कांदेकर यांचा स्वतःचा मच्छीमारी व्यवसाय नसला तरी अनेक नातेवाईक या व्यवसायात आहेत. ते सांगतात, गेल्यावर्षी मच्छीमारांची स्थिती अगोदरच वाईट झालेली असताना चक्रीवादळाचा फटका बसला आहे. दुसरा व्यवसाय नसल्याने सर्वजण शून्यात नजर लावून आहेत. या सर्वांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी, जेणेकरून ते थोडीफार मच्छीमारी करून रोजीरोटी सोडवतील.

- Advertisement -

सर्व व्यवसाय अशा प्रकारे ठप्प झाल्याने जिल्ह्यातील अर्थव्यवस्था ढासळली आहे. नुकसानीचे स्वरुप पाहिले तर अनेकांची गाडी पुन्हा रूळावर येण्यासाठी पुढील किमान १० वर्षे लागणार आहेत. येणारी नुकसान भरपाई गरजूंच्या हातात पोहचेपर्यंत काहीवेळेला त्याला फाटे फुटतात. अशा आपत्तीच्या काळात मदत मिळवून देणार्‍या दलालांची साखळी तयार होते, हा अनुभव रायगडला नवा नाही. त्यामुळे वरिष्ठ अधिकार्‍यांचेही याकडे लक्ष असले पाहिजे. मदतीबाबतच्या प्रतिक्रियांसह काही महत्त्वाच्या विषयांचा ऊहापोह पुढील, शेवटच्या भागात.

अर्थचक्र विस्कटले; चिंता पुढील १० वर्षांची…
Uday Bhisehttps://www.mymahanagar.com/author/uday-bhise/
गेली २७ वर्षे वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत. सामाजिक, राजकीय विषयांवर लिखाणाची विशेष आवड. डिजिटल मीडियाचाही अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -