घरमहाराष्ट्रसोशल मीडियावर मुख्यमंत्र्यासह इतर मंत्र्यांची बदनामी; पोलिसात गुन्हा दाखल

सोशल मीडियावर मुख्यमंत्र्यासह इतर मंत्र्यांची बदनामी; पोलिसात गुन्हा दाखल

Subscribe

सोशल मीडियावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून बदनामी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी समीत ठक्कर नावाच्या एका व्यक्तीविरुद्ध व्ही. पी. रोड पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा आणि सायबर सेल पोलिसांकडून तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले.

यातील तक्रारदार विधी व्यावसायिक असून ते शिवसेना पक्षासाठी काम करतात. तसेच ते शिवसेनेच्या वतीने विविध न्यायालयीन कामकाज पाहतात. त्यांचे ट्विटरवर एक अकाऊंट आहे. या अकाऊंटवरुन ते त्यांच्या सहकारी मित्रांसह इतरांना ट्विट करतात. तसेच त्यांचे आलेले संदेश पाहतात. काही दिवसांपूर्वी त्यांना समीत ठक्कर नावाच्या एका व्यक्तीचा ट्विटरवर आलेला एक संदेश वाचण्यात आला होता. त्यात समीतने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध अनेक आक्षेपार्ह आणि अश्लील ट्विट केल्याचे दिसून आले. या संदेशात समीतने आदित्य ठाकरे यांचा उल्लेख आझमशहा ऑफ महाराष्ट्र ऊर्फ बेबी पेग्वीन, असा करून त्यांचा अपमान तसेच बदनामी केल्याचे नमूद केले होते. त्यानंतर त्यांना उर्जामंत्री नितीन राऊत यांच्याविषयीही काही आक्षेपार्ह ट्विट केल्याचे दिसून आले. त्यांच्याविषयी अत्यंत घाणरेड्या तसेच अश्लील भाषेचा उपयोग करुन समीत ठक्करने त्यांना अश्लिल शिवीगाळ केली होती.
नितीन राऊत यांनी महाराष्ट्राच्या सामान्य जनतेला कुमार्गाला नेऊन उर्जामंत्र्याची प्रतिमा मलीन केली आहे, असा आरोप केला होता. तसेच ३० जूनला उद्धव ठाकरे यांचा लॅपटॉपसमोर खुर्चीत बसलेला फोटो अपलोड करून त्यांच्याविषयी अश्लिल टिप्पनी केली होती. अशा प्रकारे समीत ठक्करने मुख्यमंत्र्यासह त्यांच्या सहकारी मंत्र्यांविषयी मोहम्मद आझम खान, बेबी पेग्वीन, मॉर्डन औरंगजेब आदी आक्षेपार्ह संबोधने आणि चुकीची माहिती प्रसारीत करून बदनामीकारक ट्विटद्वारे सर्वसामान्यांमध्ये त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार उघडकीस येताच तक्रारदारांनी व्ही. पी. रोड पोलीस ठाण्यात लेखी अर्जाद्वारे समीत ठक्करविरूद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरूद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा तसेच सायबर सेलला संमातर तपासाचे आदेश दिले आहे. तसेच आरोपीला अटक करुन त्याच्याविरूद्ध कारवाई करण्यास सांगितले आहे.

हेही वाचा –

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -