घरगणेशोत्सव २०१९पर्यावरणस्नेही गणेशोत्सव घेतोय आकार!

पर्यावरणस्नेही गणेशोत्सव घेतोय आकार!

Subscribe

पर्यावरणस्नेही गणेशोत्सव ही गेल्या काही वर्षांपासून चर्चेत असलेली संकल्पना शहरात रूजत असताना आता ती ग्रामीण भागातही स्वीकारली जाऊ लागल्याचे सुखद चित्र यावेळी मोठ्या प्रमाणात दिसणार आहे. याची सुरूवात अनेक घरांमधून चकचकीत गणेशमूर्ती ऐवजी पारंपरिक शाडू मातीच्या मूर्तीपासून होऊ लागली आहे.

पर्यावरणाच्या हानीबद्दल, विसर्जनानंतर नदी व चौपाट्यांवर दिसणार्‍या गणेशमूर्तींच्या अवशेषांबद्दल समाज माध्यमांमधून चर्चा व्हायला लागली. त्यानंतर गणेशभक्तांनी त्याकडे अधिक डोळसपणे पहायला सुरुवात केली आहे. घरगुती गणेशमूर्तींसाठी पर्यावरणस्नेही मूर्तींचा विचार होऊ लागला आहे. थर्माकोलच्या देखण्या मखरांची जागा कागदी मखरे, पडद्यांची सजावट, फुलांची सजावट यांनी घेतली आहे. मूर्तींच्या उंचीच्या स्पर्धेमुळे काही घरांतील मूर्ती मोठ्या आणण्याकडे कल असतो. शाडूच्या मूर्ती मोठ्या आकारात तयार करणे अशक्य असते. परंतु मोठी, अर्थात प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती न आणता छोटी मूर्ती आणावी लागते. त्यामुळे आपसूकच शाडू मातीच्या मूर्तीला अधिक पसंती मिळत आहे.

- Advertisement -

कागद हा पर्यावरणस्नेही असल्याने काहींनी कागदाच्या लगद्यापासून तयार केलेल्या मूर्ती स्वीकारल्या आहेत. मात्र याबद्दलही आता प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला सुरूवात झाली आहे. कागदाची मूर्ती करताना ती वापरात आलेल्या कागदाच्या लगद्यापासून केली जाते. यामध्ये वृत्तपत्रांच्या रद्दीच्या कागदाचे प्रमाण अधिक असते. काहीही न लिहिलेला किंवा कोरा कागद प्रदूषण निर्माण करत नाही. मात्र मूर्तीसाठी वापरण्यात येणारा कागद हा त्यावर काहीतरी छापल्यानंतर रद्दीत विकलेला असतो. या कागदावर झालेल्या रासायनिक प्रक्रियेमुळे, तसेच त्यावरील शाईमुळे पर्यावरणाला धोका निर्माण होतो, असे पर्यावरणस्नेहींचे मत आहे.

शाडूची माती पाण्यात पाऊण ते एक तासात विरघळते. पण प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती दीर्घ काळ तशाच राहतात. प्लास्टर ऑफ पॅरिस सोबतच या मूर्तींवर वापरले जाणारे रंग धोकादायक आहेत. या मूर्तींसाठी पर्यावरणस्नेही रंगांचा वापर होण्याची खात्री नसते. मूर्तीसाठी वापरल्या जाणार्‍या सर्वच कंपन्यांच्या रंगांवर पर्यावरणस्नेही रंगाचा शिक्का नसतो. शाडूवर अनेकदा पाण्यात विरघळून जाणारे रंग वापरलेले असतात. गेल्या पाच वर्षांत पर्यावरणस्नेही मूर्तींची मागणी वाढली आहे. मात्र वाढती मागणी पूर्ण करणे काहीवेळा अशक्य होते. शाडूच्या मूर्ती सुकायला जास्त वेळ लागतो. पाऊस असेल तर हा कालावधी आणखी वाढतो, असे मूर्तिकारांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

शाडूची मोठी मूर्ती तयार करायला साधारणपणे एक महिना लागतो. प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती बनवायचा साचा तयार असेल तर मूर्ती कमी वेळात तयार करता येते. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा म्हणून सरकार जनजागृतीवर कोट्यवधींचा निधी खर्च करते. पण शाडूच्या गणेशमूर्तींना अनुदान देताना चालढकल केली जात असल्याचे मूर्तिकार तुषार गुंजाळ यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -