घरमहाराष्ट्रनाशिकउभ पिकं वाया जाताना पाहून बळीराजाचे डोळे पाणावले

उभ पिकं वाया जाताना पाहून बळीराजाचे डोळे पाणावले

Subscribe

नाशिक : येवला तालुक्यातील अनेक ठिकाणी खरीप पिके पूर्णपणे पावसाअभावी जळून जात आहेत. विशेषतः तालुक्यातील उत्तर-पूर्व भागात उभी पिके जणू पेटून उठली आहेत. आज होईल, उद्या होईल, पुढील आठवड्यात भरपूर होणार आहे अशी पावसाची भविष्यवाणी करणारे स्वयंघोषीत हवामान तज्ञ व हवामान खात्याचे अंदाज यावर्षी पावसाने सपशेल धुडकावून लावल्याने शेतकर्‍यांचे मात्र मोठे आर्थिक नुकसान झाले असून पिण्याच्या पाण्याचा अन् पशुधनाच्या चार्‍याचा प्रश्न देखिल बिकट झाला आहे.

मान्सूनच्या पावसाचे चालूवर्षी खरीपात उशिरा आगमन झाले. झालेला पाऊसही अत्यंत तोकडा रिम् झिम्म पडला. कमी ओलीवर पेरणी केलेली खरीप पिकांचा उताराही कमी झाला आहे. गेल्या महिन्यापासून पावसाने पुन्हा दडी मारल्याने ही पिके पाण्याअभावी जळून गेली आहे. उत्तर-पूर्व भाग अवर्षणग्रस्त भाग असल्याने विहिरी व बोअरवेल्स कोरडे पडलेले आहेत. पावसाळ्याचे अडीच महिने संपून गेले आहेत. शेती मशागत, पेरणी, बियाणे, खते, कीटकनाशके आदींसाठी एकरी हजारो रुपयांचा खर्च शेतकरी करून बसले आहेत.

- Advertisement -

मात्र पावसाच्या मोठ्या खंडामुळे पिके ऐन फुलोर्याच्या टप्प्यात पूर्णतः जळाली आहेत. फुलोरा गळून गेल्यामुळे आता एवढ्यात जरी पाऊस झाला तरी मका, मुग बाजरी,सोयाबिन पिकाला काही फायदा होणार नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे चालू वर्षाचा खरीप जवळपास वाया गेल्याची चिन्हे आहेत. जून अखेर शेतकर्‍यांचे पशुधनाच्या चार्‍याचे नियोजन असते. मात्र ऑगस्ट संपत आला तरी पाऊस नसल्याने पशुधनाच्या चार्‍याचा प्रश्नही बिकट झालेला आहे. त्यामुळे पशुधन व्यवसाय संकटात सापडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यामुळे चालू वर्षी शेतकरी मोठ्या संकटात सापडल्याचे चित्र परिसरात आहे.

पावसाअभावी संपूर्ण उभ पिकं वाया जात असल्याचे पाहून अश्रू अनावर झाले आहे. जो दिवस उगवतो तो सारखाच, असं करता-करता पिकाचा पाचोळा झाला आहे. उसनवारीने पैसे घेऊन बियाणे खरेदी केले आणि पिके वाया गेली. पेरणीची उठाठेव नसती केली तर बरी झाली असती. : साहेबराव देवकर, शेतकरी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -