घरमहाराष्ट्रऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा

Subscribe

अंतिम वर्षाची परीक्षा घरातून देण्यास राज्यपालांची मंजुरी,31 ऑक्टोबरला निकाल, 15 ते 30 सप्टेंबरपर्यंत प्रॅक्टिकल परीक्षा,विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेणार

अंतिम वर्षाच्या लेखी परीक्षा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात, तर निकाल 31 ऑक्टोबरपर्यंत जाहीर होईल. तसेच 15 ते 30 सप्टेंबरपर्यंत प्रॅक्टिकल परीक्षा होतील, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना या परीक्षा घरी बसून देण्यास राज्यपालांनी मंजुरी दिल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. अंतिम वर्षाची परीक्षा विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेत सोप्या पद्धतीने होणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने परीक्षा न घेण्याचा घेतलेला निर्णय आणि यूजीसीने परीक्षा घेणे बंधनकारक केल्याने मोठा वादंग निर्माण झाला होता. परीक्षा न घेण्यासंदर्भात महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान या राज्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावेळी परीक्षेशिवाय अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात येऊ नये असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यानंतर परीक्षा कधी आणि कशा होणार याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता होती. अखेर बुधवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यावर पडदा टाकला. राज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत आणि कुलगुरु समितीची बैठक पार पडली.

- Advertisement -

या बैठकीत अंतिम वर्षाच्या परीक्षा कशा घ्यायच्या यावर चर्चा झाली. त्यानंतर 15 ते 30 सप्टेंबरपर्यंत प्रॅक्टिकल परीक्षा होतील तर 31 ऑक्टोबरपर्यंत जाहीर होईल, असे सामंत यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना या परीक्षा घरी बसून देता येणार आहेत. लेखी परीक्षेप्रमाणे प्रॅक्टिकल परीक्षेलाही त्यांना कॉलेजमध्ये जावे लागणार नाही यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी मनात कोणताही संभ्रम न ठेवता अभ्यासाला लागावे, असे सांगताना त्यांनी अंतिम वर्षाच्या लेखी परीक्षा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट केले. परीक्षेची तारीख अद्याप निश्चित झाली नसली तरी लवकरच वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, असे सामंत यांनी सांगितले.

परीक्षा घेण्यासंदर्भातील निर्णय कुलगुरू घेणार असून, त्यासंदर्भात कुलगुरूंची समिती आपला अहवाल शुक्रवारी दुपारी 12 वाजेपर्यंत सादर करणार आहेत. परीक्षा कशा घ्यायच्या हा निर्णय कुलगुरू आणि विद्यापीठांनी घ्यायचा होता. परीक्षा घेण्यासाठी वेगवेगळे पर्याय समोर आहेत. त्यावर चर्चा सुरू असून सोपी पद्धत वापरण्यावर एकमत झाले असल्याचे सामंत म्हणाले. परदेशात जाणार्‍या विद्यार्थ्यांचे काय करायचे याबाबतही आम्ही चर्चा करून निर्णय घेऊ. राज्यपाल आणि आमच्यामध्ये विसंगती नाही. आम्ही सर्वजण एकमेकांच्या संपर्कात असून राज्यपालांशी चर्चा सकारात्मक झाली. पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या परीक्षा देखील सोप्या पद्धतीने होणार असल्याचे ते म्हणाले. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन शैक्षणिक वर्ष सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -