घरक्राइमसंजय राऊत आणि स्वप्ना पाटकर वाद : धमकी २०१६ ला, तक्रार दाखल...

संजय राऊत आणि स्वप्ना पाटकर वाद : धमकी २०१६ ला, तक्रार दाखल २०२२ ला!

Subscribe

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अटकेनंतर राज्यात राजकीय पडसाद उमटत आहेत. पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणात ईडीने संजय राऊत यांच्यावर ही कारवाई केलेली असतानाच या प्रकरणातील साक्षीदार स्वप्ना पाटकर यांना धमकावल्याप्रकरणी वाकोला पोलिसांनी संजय राऊत यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला आहे. मात्र स्वप्ना पाटकर यांना संजय राऊत यांनी कथित धमकी दिल्यानंतर तब्बल सहा वर्षांनी याची तक्रार दाखल केल्याचे समोर आले आहे.

मनी लॉण्ड्रिंग कायद्याअंतर्गत नोंदवण्यात आलेल्या गोरेगावमधील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पामधील आर्थिक घोटाळ्याप्रकरणाच्या चौकशीसाठी ईडीचे पथक काल सकाळी सातच्या सुमारास संजय राऊत यांच्या मैत्री या निवासस्थानी धडकले होते. नंतर सायंकाळी त्यांना ईडी कार्यालयात नेण्यात आले व रात्री उशिरा संजय राऊत यांना अटक करण्यात आली. यादरम्यान, या प्रकरणातील साक्षीदार स्वप्ना पाटकर यांना संजय राऊत धमकावल्याची तक्रार वाकोला पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. त्याआधारे वाकोला पोलिसांनी संजय राऊत यांच्याविरोधात कलम ५०४, ५०६ आणि ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

पत्राचाळ घोटाळ्याचा संबंध आहे का?
संजय राऊत यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार स्वप्ना पाटकर यांनी ३१ जुलै २०२२ रोजी वाकोला पोलिसांकडे दिली आहे. मात्र प्रत्यक्षात ही धमकी तब्बल सहा वर्षांपूर्वी दिली असल्याचे एफआयआरमधील नोंदीवरून स्पष्ट होते. सहा वर्षांपूर्वीचा हा संदर्भ लक्षात घेता, हे प्रकरण अन्य कोणत्या तरी व्यवहाराशी संबंधित असावा, असे सकृतदर्शनी तरी दिसते. शिवाय, या तक्रारीत पत्राचाळीचा कुठेही स्पष्ट उल्लेख आढळत नाही. तसेच पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने १३ मार्च २०१८ला एफआयआर नोंदवला आहे.

काय आहे तक्रारीत?
स्वप्ना पाटकर या २० नोव्हेंबर २०१६ रोजी संजय राऊत यांना भेटण्यासाठी प्रभादेवी येथील दैनिक सामनाच्या कार्यालयात गेल्या होत्या. तेव्हा त्यांनी माझ्याशी मोठ्या आवाजाने बोलत शिवीगाळ केली तसेच माझा हातही पकडला. तेव्हा मी त्यांची कॉलर पकडून त्यांना हाताने मारले, असे स्वप्ना पाटकर यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. त्यानंतर खासदाराची कॉलर पकडलीस म्हणून पोलीस तुला पकडून घेऊन जातील, असे राऊत यांनी सांगितल्यावर ‘मला चालेल,’ असे सांगून मी निघून गेल्याचेही पाटकर यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

माझे पती सुजीत पाटकर यांनी २००९-१०मध्ये माझ्या नावावर वेगवेगळ्या ठिकाणी जागा खरेदी करण्याचे ठरविले होते. त्यानुसार त्यांनी जागा खरेदी केल्या, अशी माहिती पाटकर यांनी तक्रारअर्जात दिली आहे. नंतर दोन दिवसांनी म्हणजे २२ नोव्हेंबर २०१६ रोजी दुपारी २च्या सुमारास संजय राऊत यांनी फोन करून मला शिवीगाळ केली आणि ‘तुझ्या नावावर असलेली जमीन सुजीत (स्वप्नाचे पती) किंवा माझ्या नावावर कर. नाहीतर बघ,’ अशी धमकी दिल्याचे स्वप्ना पाटकर यांनी या तक्रारीत म्हटले आहे.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -