घरमहाराष्ट्रदेशातील पहिले ‘इनोव्हेशन सेंटर’ मराठी शाळेत!

देशातील पहिले ‘इनोव्हेशन सेंटर’ मराठी शाळेत!

Subscribe

रोबोटिक्स, आयओटी आणि थ्री-डी प्रिंटिंगच्या माध्यमातून विद्यार्थी साकारणार इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट्स

शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञानाची आवड निर्माण व्हावी. भविष्यातील तंत्रज्ञानातील नव्या आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण व्हावी यासाठी सायनच्या शिव शिक्षण संस्थेच्या डी.एस. हायस्कूलतर्फे ‘इनोव्हेशन सेंटर’ सुरू करण्यात येत आहे. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी प्रथमच इनोव्हेशन सेंटर सुरू करण्याचा मान यामुळे डी. एस. हायस्कूलला मिळाला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण पद्धतीने विचार करता यावे यासाठी विद्यार्थ्यांना रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) आणि थ्री-डी प्रिंटिंग यांसारख्या वैज्ञानिक विषयांची अत्याधुनिक प्रयोगशाळा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

धारावी, चुनाभट्टी येथील कष्टकरी घरांतील विद्यार्थ्यांना रोबोटिक्स, आयओटी आणि थ्री-डी प्रिंटिंग यांसारख्या तंत्रज्ञान विषयांची अत्याधुनिक प्रयोगशाळा ही हायस्कूलचे अध्यक्ष राजेंद्र प्रधान आणि ‘ग्रॉक लर्निंग’चे नितीन कोमावर यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आली. ‘इयत्ता सहावी, सातवी, आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांना या इनोव्हेशन सेंटरमध्ये रोबोटिक्स, आयओटी आणि थ्री-डी प्रिंटिंगचे प्रयोग करता येणार आहेत. या इनोव्हेशन सेंटरमुळे विज्ञान, अभियांत्रिकी, गणित आणि तंत्रज्ञान यामधील संकल्पना विद्यार्थ्यांना अधिक स्पष्ट तर होतीलच, पण त्या आधारे नवनवीन उपकरणे, मशिन्स बनवण्यासाठी प्रयोग करण्याची प्रेरणा त्यांना मिळेल.

- Advertisement -

शिव शिक्षण संस्थेच्या पुढाकाराने आणि ‘ग्रॉक लर्निंग’च्या माध्यमातून अशा प्रकारची इनोव्हेशन सेंटर्स अन्य शाळांमध्ये उभारण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे ‘ग्रॉक लर्निंग’चे नितीन कोमावार यांनी सांगितले. रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज, थ्री डी प्रिंटिंग आणि डाटा सायन्स या चार गोष्टी आपले आयुष्य बदलून टाकत आहेत. त्यातील मूलभूत संकल्पना समजल्यामुळे मुलांना वेगळाच आत्मविश्वास येईल आणि त्यांच्यात आजच्या युगातील रोजगार निर्माण करण्याची क्षमता निर्माण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

डी. एस. हायस्कूलचे अध्यक्ष राजेंद्र प्रधान आणि ‘ग्रॉक लर्निंग’चे नितीन कोमावर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या इनोव्हेशन सेंटरच्या उभारणीसाठी रोटरी क्लब सेवाभावी संस्थेने शाळेला 10 लाखांचे आर्थिक सहकार्य केले आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांप्रमाणे प्रयोग करता येतील, अशा सुसज्ज ‘इनोव्हेशन सेंटर’चे उदघाटन सोमवारी ख्यातनाम गायक शंकर महादेवन आणि लायन्स क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर हरजित सिंग तलवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी रोटरी क्लबचे उर्मिला प्रभू, भुपेंद्र शाह, शुभलक्ष्मी छापवाले आणि राजेंद्र छापवाले आदी उपस्थित होते.

- Advertisement -

संगीत आणि विज्ञान या दोन्ही क्षेत्रांत उत्तुंग कामगिरी करणारे विद्यार्थी डी. एस. हायस्कूल घडवेल, यात शंका नाही. शाळेचे विद्यार्थी कला-क्रीडा अशा सर्वच क्षेत्रांत उत्तम कामगिरी बजावत आहेत. पण भविष्यात देश-विदेशातील वैज्ञानिक- मेकॅनिक्स स्पर्धांमध्येही डी. एस. हायस्कूलचे विद्यार्थी चमकतील असा विश्वास डी. एस. हायस्कूलमध्ये संगीत विषयक प्रशिक्षण देणारे ख्यातनाम गायक शंकर महादेवन यांनी व्यक्त केला.

इनोव्हेटिव्ह सेन्टरमुळे विद्यार्थी वेगवेगळी आव्हानात्मक प्रॉडक्ट्स बनवू शकतील. शाळेतील अनेक विद्यार्थी कष्टकरी वर्गातील आहेत. या विद्यार्थ्यांना इनोव्हेशन सेन्टरमधील प्रशिक्षण मोफत मिळणार आहे. दहावी पास झाल्यानंतर हे विद्यार्थी रोजगारक्षम होतील.
– राजेंद्र प्रधान, अध्यक्ष, डी. एस. हायस्कूल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -