घरमहाराष्ट्रमाजी मंत्री तुकाराम दिघोळे यांचे निधन

माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांचे निधन

Subscribe

महाराष्ट्र राज्याचे माजी ऊर्जा राज्यमंत्री तुकाराम दिघोळे (वय ७९) यांचे आज, शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर दुपारी ३ वाजता क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. तुकाराम दिघोळे १९८५ ते १९९९ या काळात सलग तीन वेळा सिन्नरचे आमदार होते. त्यांच्या कार्यकाळात सिन्नरला एमआयडीसी, पाणी पुरवठा योजना, कडवा प्रकल्पाचे कामकाज पूर्ण झाले यामुळे सिन्नरच्या विकासाला गती आली. सिन्नर घोटी या मार्गाचे कामही त्यांच्याच काळात झाले.

नाशिकमधील नामांकित क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचे ते अनेक वर्षे अध्यक्ष होते. त्यांच्या काळात या शिक्षण संस्थेचा खऱ्या अर्थाने विकास झाला. पारंपरिक शिक्षणाबरोबर त्यांनी अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करून संस्था प्रगती पथावर नेली. एक सुसंस्कृत नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. १९९५ मध्ये अपक्ष निवडून आल्यानंतर ते युतीच्या सरकारमध्ये ऊर्जा राज्यमंत्री होते. या मंत्रिपदाचा उपयोग करून त्यांनी सिन्नरमध्ये अनेक पायाभूत विकासाची कामे केली तसेच सिन्नर हे औद्योगिक विकासाचे केंद्र व्हावे याचे नियोजन केले. पुढे सत्तांतरानंतर त्यांच्या योजनांना खीळ बसली, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक वर्षे प्रदेश उपाध्यक्ष होते. पगेले काही महिने त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे ३ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे पुत्र अभिजित दिघोळे, मुलगी, पत्नी असा परिवार आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

Live Update : ठाकरे सरकार आज विश्वासदर्शक ठराव मांडणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -