घरCORONA UPDATEमाध्यान्ह भोजनाचे धान्य गरीब विद्यार्थ्यांना वाटणार!

माध्यान्ह भोजनाचे धान्य गरीब विद्यार्थ्यांना वाटणार!

Subscribe

देशात असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन अंगणवाडी व शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनातील शिल्लक राहिलेल्या धान्याचे वाटप करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांना पोषक आहार मिळावा यासाठी राज्यातील प्रत्येक सरकारी आणि पालिकेच्या शाळांमधून विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन दिले जाते. जिल्हा परिषदेच्या आणि पालिकेच्या शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात गरीब विद्यार्थी शिक्षण घेत असतात. सध्या देशात असलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे गरीब विद्यार्थ्यांना दोन वेळचे जेवण मिळणे मुश्किल झाले आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या सूमोटो रिट याचिकेवर विद्यार्थ्यांना आहार देणे आवश्यक असल्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार शाळा स्तरावर शिल्लक असलेला तांदूळ, डाळी, कडधान्य विद्यार्थ्यांना तसेच हंगामी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना वितरित करण्याचे निर्देश राज्याचे उपसचिव राजेंद्र पवार यांनी परिपत्रकाद्वारे शिक्षण आयुक्तांना दिले आहेत. तसेच धान्याचे वाटप करण्याची पूर्वकल्पना जिल्हाधिकारी आणि पोलिसांना देण्यात यावी असे स्पष्ट करत धान्य वाटपाच्या अनुषंगाने आवश्यक निर्णय शाळा व्यवस्थापन समितीला दिले असल्याचेही परिपत्रकात म्हटले आहे.

- Advertisement -

धान्य वाटपाबाबत सूचना

– तांदूळ, डाळी किंवा कडधान्य यांचे वाटप करताना शाळा स्तरावर गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी
– विद्यार्थी व पालक यांना टप्याटप्याने शाळेत बोलावून वस्तूंचे वाटप करावे
– विद्यार्थी आणि पालक आजारी असल्यास त्यांच्या वस्तू घरपोच करण्याचे नियोजन करावे
– वस्तू वाटपाबाबत शाळा स्तरावर प्रसिद्धी करण्यात यावी

कोरोनामुळे यंदा शाळा लवकर बंद करण्यात आल्या. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या माध्यान्ह भोजनाचा शिधा मोठ्या प्रमाणात शिल्लक राहिला आहे. हे धान्य राज्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये वाटप करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

विशाल सोळंकी, आयुक्त, शिक्षण विभाग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -