Maharashtra Lockdown 2021: … तर महाराष्ट्रात पुन्हा कडक लॉकडाऊन – राजेश टोपे

Rajesh tope demand overall audit for crop panchanama procedure in cabinet
Maharashtra Lockdown 2021: ... तर महाराष्ट्रात पुन्हा कडक लॉकडाऊन - राजेश टोपे

राज्यातील कोरोना निर्बंधात आता आणखीन दिलासा देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी राज्यातील कोरोना निर्बंध शिथिलतेच्या जारी केलेल्या नियमांमध्ये हॉटेल्स, रेस्टॉरंट व्यावसायिकांना दिलासा मिळाला नव्हता. पण आता ठाकरे सरकारकडून हॉटेल्स, रेस्टॉरंट व्यावसायिकांना दिलासा दिला आहे. पूर्वी हॉटेल्स, रेस्टॉरंट फक्त ५० टक्के क्षमतेने ४ वाजपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र आता १५ ऑगस्टपासून हॉटेल्स, रेस्टॉरंट १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी ठाकरे सरकारने दिली आहे. एकाबाजूला ठाकरे सरकार निर्बंधात शिथिलता देत असले तरी दुसऱ्या बाजूला पुन्हा लॉकडाऊन लावण्याचा इशारा देखील देत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेदरम्यान ज्या दिवशी राज्यात दिवसापोटी ७०० मेट्रिक टन ऑक्सिजन लागेल त्यावेळेस पुन्हा कडक लॉकडाऊन लावण्यात येईल, असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.

नक्की काय म्हणाले राजेश टोपे?

नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत राजेश टोपे म्हणाले की, ‘तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने एकूण उत्पादित होणाऱ्या लिक्विड मेडिकल ऑक्सिजन १३०० मेट्रिक टन आहे. त्यामध्ये औद्योगिक क्षेत्राने आणखीन २०० ते ३०० मेट्रिक टन वाढवू अशा पद्धतीचे खात्री दिली असून त्यापद्धतीने वाढ केली जात आहे. दरम्यान ४५० पीएसए प्लांटची ऑर्डर देण्यात आली असून यापैकी १४१ प्लांटची सुरुवात प्रत्यक्षात झाली आहे. म्हणजेच ऑक्सिजन निर्मितीच्या कामाला सुरुवात झाली आहे. येत्या काळात १७०० ते २००० मेट्रिक टन उपलब्ध होऊ शकणार आहे.’

पुढे टोपे म्हणाले की, ‘केंद्र शासनाने तिसऱ्या लाटेच्या संदर्भात सांगितले होते की, दुसऱ्या लाटेचा कालावधी ऑक्सिजनचा जो पिक होता, त्याच्या दीड पटीपर्यंतची व्यवस्था करा, असे सूचित केल्याच्या कारणाने जवळ जवळ ३८०० मेट्रिक टनपर्यंत ऑक्सिजन लागू शकणार आहे. पण तिसऱ्या लाटेमध्ये ज्या दिवशी ७०० मेट्रिक टन दररोज लागेल त्यावेळेस महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन ऑटोमोडमध्ये करण्यात येईल, असा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. इतर राज्यातसुद्धा ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात लागत असल्याकारणाने केंद्राकडून किती मदत होऊ शकेल हे वेळेवर हे सांगता येणं शक्य नसल्यामुळे यासंदर्भात सुद्धा आज निर्णय घेण्यात आला आहे.’