घरमहाराष्ट्रतांत्रिक अडचणींमुळे आरोग्य विभागाची भरती परीक्षा लांबणीवर; विद्यार्थांमध्ये गोंधळ

तांत्रिक अडचणींमुळे आरोग्य विभागाची भरती परीक्षा लांबणीवर; विद्यार्थांमध्ये गोंधळ

Subscribe

येत्या २५ आणि २६ सप्टेंबरला होणारी आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. तांत्रिक अडचणींमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं आरोग्य विभागाने सांगितलं आहे. आरोग्य विभागाच्या क आणि ड वर्गातील पदांसाठी ही भरती परीक्षा होणार होती. मात्र, प्रवेशपत्रिकेबाबतच्या तक्रारी परिक्षार्थ्यांकडून आल्या होत्या. यामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली. परंतु, प्रशासनाच्या या गोंधळामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

आरोग्य विभागाचं स्पष्टीकरण

कोरोनाच्या महामारीमध्ये काम करण्यासाठी आरोग्य विभागास अधिक सक्षम करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. यामध्ये प्रामुख्याने आरोग्य विभागात असणारी मोठया प्रमाणावरची पदभरती करणे हा प्रमुख निर्णय होता. पदभरती पारदर्शकपणे, सक्षमपणे युध्दपातळीवर होण्यासाठी बाह्य नियुक्त कंपनीव्दारे करण्यासाठी शासनामार्फत विचार करण्यात आला. त्या दृष्टीकोनातून सामान्य प्रशासन विभागाचे दि.२० फेब्रुवारी २०२० रोजीच्या शासन निर्णयामधील महापरिक्षा पोर्टल अंतर्गत घेण्यात येणाऱ्या परीक्षा पध्दतीत बदल करून सुधारित कार्यपध्दती विहीत करण्यात आली आहे.

- Advertisement -

सामान्य प्रशासन विभाग (माहिती व तंत्रज्ञान) यांचे दि.२१.१.२०२१ अन्वये ओएमआर व्हेन्डॉरच्या पॅनेलची नियुक्ती करण्यात आलेली आहे या पॅनेलमधील सर्व कंपनीच्या सक्षमता तपासण्यासाठी सर्वकप चाचणी विभागामार्फत घेण्यात आली होती. शासन नियुक्त पॅनेलमधील चाचणीमध्ये गुणानुक्रमे प्रथम आलेल्या मे न्यासा कम्युनिकेशन प्रा.लि. या कंपनीस भरतीचे काम करण्यासाठी करारबध्द करण्यात आले होते. या करारातील अटी व शर्तीनुसार आरोग्य विभागाकडून प्रश्नपत्रिका संच गोपनीयरित्या कंपनीस हस्तांतरण करणे एवढीच जबाबदारी विभागाची होती. अन्यथा भरती प्रक्रियेमधील इतर महत्वाच्या कृती उदा. संकेतस्थळाची स्थापना करणे, ऑनलाईन अर्ज मागविणे, उमेदवारांना प्रवेश पत्र देणे, शाळा महाविदयालय अधिग्रहीत करुन बैठक व्यवस्था करणे, लेखी परिक्षा घेणे व गुणवत्ता यादी तयार करणे ही सर्वस्वी जबाबदारी कंपनीची होती.

परिक्षा सुरळीतपणे पार पडण्यासाठी आरोग्य विभागाने कंपनीस आवश्यक असणारे सर्व सहकार्य वेळोवेळी केलेले आहे. कंपनीने केलेल्या सर्व कामकाजाचा प्रगती पर अहवाल व आढावा घेतलेला आहे विभागाचे सहकार्य, वेळोवेळी केलेली मदत या सर्व पार्श्वभुमीवर सुध्दा मे न्यासा कम्युनिकेशन प्रा. लि. कंपनी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना प्रवेश पत्र देण्यास व आवश्यक असणारी बैठक व्यवस्था करण्यास अपयशी ठरली आहे. एकूणच परिक्षेची सर्व तयारी वेळेवर पूर्ण न झाल्यामुळे मे न्यासा कम्युनिकेशन प्रा.लि. कंपनीच्या संचालकांनी परिक्षा घेण्यास दि. २४/९/२०२१ रोजी संध्याकाळी ०७.०० वाजता असमर्थ असल्याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागास कळविले आहे

- Advertisement -

अर्ज भरलेल्या प्रत्येक उमेदवारास परिक्षेस बसण्याची संधी नैसर्गिक न्याय तत्वानुसार प्राप्त झाली पाहिजे म्हणून सर्व उमेदवारांच्या हिताचा विचार लक्षात घेता गट-क करिता दि. २५/९/२०२१ व गट-ड करिता दिनांक २६/९/२०२१ रोजी आयोजित केलेल्या लेखी परिक्षेचे आयोजन पुढे ढकलण्यात आलेले आहे.

अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना प्रवेश पत्र मिळाल्याची खात्री करुनच सर्व परिक्षेचे सक्षमपणे व पारदर्शकपणे भविष्यात आयोजन करण्याच्या हेतूने हा निर्णय मा. आरोग्य मंत्री, सार्वजनिक आरोग्य विभाग यांचे अध्यक्षतेखाली विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांच्या उपस्थितीत मा. मुख्यमंत्री व मा.उपमुख्यमंत्री यांचेशी चर्चा करुन घेण्यात आलेला आहे. • सर्व उमेदवारांना परिक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयामुळे झालेल्या मानसिक त्रासाबाबत विभागाकडून या निवेदनाव्दारे दिलगिरी व्यक्त करण्यात येत आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाची गट-क व गट-ड संवर्गाची परिक्षा लवकरच घेण्यात येईल व परिक्षेची नियोजीत तारीख सर्व उमेदवारांना कळविण्यात येईल. हा निर्णय सर्व उमेदवारांना विभागाच्या संकेतस्थळावरुन, वैयक्तिक संपर्क क्रमांकावर संदेश तसेच ईमेलव्दारें अवगत करण्यात येत आहे.

परिक्षेची नियोजीत तारीख कंपनीमार्फत पुर्वतयारी पूर्ण करून तसेच तांत्रिक बाबींची पूर्तता करून लवकरच निश्चित करण्यात येईल.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -