घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रहृदयद्रावक! रस्त्याविना अडीच किलोमीटर झोळीत प्रवास; अखेर 'त्या' गर्भवतीने गमावला जीव

हृदयद्रावक! रस्त्याविना अडीच किलोमीटर झोळीत प्रवास; अखेर ‘त्या’ गर्भवतीने गमावला जीव

Subscribe

नाशिक : इगतपुरीसारख्या आदिवासी अतिदुर्गम तालुक्यात आरोग्यसेवेचा बोजवारा उडाला असून, मृत्यूनंतरही यातना संपत नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गतिमान सरकार आणि त्यांच्या ढिसाळ कारभारामुळे इगतपुरी तालुक्यातील तळोघ जुनवणेवाडी येथील गरोदर महिलेला प्राण गमवावा लागल्याचे समोर आले आहे. वनिता भावडू भगत (वय २३) असे मृत महिलेचे नाव आहे.

जुनवणेवाडी गावाला रस्ता नसल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रसुती वेदना येत असल्याने गरोदर महिला आपल्या नातेवाईकांसह मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास अडीच किलोमीटर पायी चालत रुग्णालयापर्यंत पोहोचली. मात्र, पायपीट, प्रसूतीवेदना आणि पावसामुळे झालेल्या विलंबामुळे महिलेने रुग्णालयात प्राण सोडला. तिचा मृतदेह घरी नेण्यासाठी झोळी करून तिला मंगळवारी (दि.२५) दुपारी नेण्यात आले. करोडो रुपयांच्या विकासाचे स्वप्न दाखवणार्‍या शासनाला लाजिरवाणी असणारी ही घटना असून, या गावात तातडीने रस्ता करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सिताराम गावंडा यांनी केली आहे.

- Advertisement -

तळोघ ग्रामपंचायत हद्धीत जुनवणेवाडी ही आदिवासी वस्ती आहे. मुख्य रस्त्यापर्यंत येण्यासाठी गावकर्‍यांना अडीच किलोमीटर कच्च्या रस्त्याने यावे लागते. कच्चा रस्ता पावसामुळे चिखलमय झाला आहे. जुनवणेवाडी येथील वनिता भाऊ भगत या गर्भवती महिलेला प्रसूतीवेदना सुरु झाल्याने पहाटे अडीच वाजता रुग्णालयात नेण्यासाठी नातेवाईक आणि तिने पायपीट केली. जास्तच त्रास होऊ लागल्याने तिला डोली करून त्यामध्ये झोपवण्यात आले. रुग्णालयात पोहोचल्यानंतर तिचा मृत्यू झाला. तिचा मृतदेह अंतिम संस्कारासाठी घरी नेण्यासाठी रस्त्याची समस्या असल्याने डोली करून न्यावे लागले. या घटनेमुळे इगतपुरी तालुक्यात संताप व्यक्त केला जात आहे. गरज नसलेल्या भागात कोट्यवधी रुपयांचे रस्ते करण्यात येत असतात. जुनवणेवाडीसारख्या अनेक गावात रस्ताच नसल्याने अनेक निरपराध व्यक्तींना आपला जीव गमवावा लागत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -