घरमहाराष्ट्रएकनाथ शिंदेंवर जादूटोण्याचा प्रयोग ? दोघांना अटक

एकनाथ शिंदेंवर जादूटोण्याचा प्रयोग ? दोघांना अटक

Subscribe

नगर विकास मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवाला धोका होण्यासाठी अघोरी प्रथेचा वापर करण्यात आल्याचे समोर आले आहे. जादुटोणा करणाऱ्या दोघांना बोईसर स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. पालघर उप विभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली बोईसर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विक्रमगड तालुक्यातील व जव्हार पोलीस स्टेशन हद्दीतील कऱ्हे तलावली येथून या दोघांना अटक केली आहे. जादूटोणा, नरबळी सारखे प्रकार थांबवण्यासाठी महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्यासाठी व समुळ उच्चाटन करण्यासाठी अधिनियम २०१३ अमलात आणला. मात्र, जादूटोणा सारखे अघोरी प्रकार अद्याप थांबलेले नाहीत. दरम्यान, आता या अघोरी प्रथेचा प्रयोग एकनाथ शिंदे यांच्यावर केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

विक्रमगड तालुक्यातील कऱ्हे तलावली येथील एका घरात तांदळामध्ये ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो ठेवून अलौकिक शक्तीची कृपा मिळविण्याचे हेतूने शिंदे यांच्या जीवाला धोका व्हावा अथवा त्यांच्या शरीराला जीवघेण्या जखमा होवून दुखापत करण्याकरिता जादूटोण्यासारख्या अनिष्ठ अघोरी प्रथांचा वापर करण्यात आला. एकनाथ शिंदे यांच्या फोटो समोर अगरबत्ती पेटवून हळद, कुंकू, काळा बुक्का, लिंबू , सफेद कोंबडा यांचा वापर करून अघोरी जादूटोणा करण्यात आला. याप्रकरणी पालघर उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली बोईसर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांना अटक केली. विक्रमगड तालुक्यातील आणि जव्हार पोलीस स्टेशन हद्दीतील कऱ्हे तलावली येथून दोघांना रंगेहाथ अटक केली आहे. अटक केलेली इसम हे अशा पद्धतीने जादूटोणा करून लोकांना फसवत त्यांच्याकडून पैसेही उकळत असल्याचे सांगितले जात आहे. कृष्णा बाळू कुरकुटे व संतोष मगरू वारडी अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांवर भांदवि कलम ४२०, ३४ फसवणूक आणि महाराष्ट्र नरबळी, अमानुष अनिष्ठ अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंध अधिनियम २०१३ च्या कलम २(१) (ख), (२) (३), ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलीस आता एकनाथ शिंदे यांच्यावर अघोरी जादूटोणा करणारे सुत्रधारांचा अधिक तपास करीत आहेत.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -