घरताज्या घडामोडीLata Mangeshkar Memorial : राजकारण्यांनी लतादीदींच्या शिवाजी पार्कातील स्मारकाचा वाद थांबवावा...

Lata Mangeshkar Memorial : राजकारण्यांनी लतादीदींच्या शिवाजी पार्कातील स्मारकाचा वाद थांबवावा – हृदयनाथ मंगेशकर

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून शिवाजी पार्कात भारतरत्न लता मंगेशकर यांचे स्मारक व्हावे या मुद्द्यावर राजकारण ढवळून निघाले आहेत. काही राजकीय पक्षांनी स्मारक हे शिवाजी पार्कातच व्हावे अशी मागणी केली आहे. तर काही राजकीय पक्षांनी खेळाच्या मैदानात स्मारक नको असा आक्रमक पवित्रा घेतला आहे. तर दुसरीकडे अंत्यसंस्कारासाठी आणि स्मारकासाठी शिवाजी पार्कच्या मुद्द्यावरही मतमतांतरे समोर आली आहेत. अशातच मंगेशकर कुटुंबीयांपैकी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी स्मारकाच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया देत संपूर्ण वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. राजकारण्यांनी स्मारकाचा वाद थांबवावा अशा शब्दात त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय संगीत विद्यापीठ हीच दीदींना खरी श्रद्धांजली ठरेल, असेही ते म्हणाले. शिवाजी पार्कात लतादीदींचे स्मारक व्हावे अशी इच्छा नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

भारतरत्न लता मंगेशकर यांचे ६ फेब्रुवारी रोजी मल्टीपल ऑर्गन फेल्युअरमुळे मुंबईच्या ब्रीच कॅंडी रूग्णालयात वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. त्यानंतर पाच दिवसांनी मंगेशकर कुटूंबीयांनी नाशिक येथे लतादीदींचे अस्थी विसर्जन केले. गेल्या काही दिवसांपासून शिवाजी पार्कातील लतादीदींच्या स्मारकाच्या वादावर मंगेशकर कुटूंबीयांनी पहिल्यांदाच समोर येऊन प्रतिक्रिया दिली आहे. राजकीय पक्षांमध्ये कॉंग्रेस आणि भाजपने लतादीदींचे स्मारक शिवाजी पार्कातच व्हावी अशी मागणी केली होती. पण या मागणीला शिवसेनेकडून पाठिंबा देण्यात आला नव्हता. तर मनसे आणि वंचित बहुजन आघाडीने शिवाजी पार्कातील स्मारकाला विरोध केला. आज पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या प्रतिक्रियेमुळे या स्मारकाच्या संपूर्ण वादावर पडदा पडणार हे आता निश्चित झाले आहे.

- Advertisement -

काय म्हणाले पंडित हृदयनाथ मंगेशकर ?

आमची नव्हे सर्व जगताची दीदी, त्या लतादीदींच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली आहे, ती पोकळी आकाशाएवढी नाही, अवकाशाएवढी मोठी आहे. त्या अवकाशाच्या पोकळीत अनेक गंगा जरी ओतल्या तरी ती पोकळी भरून निघणार नाही. लता मंगेशकर यांच्या स्मारकावरून वाद सुरू आहे. आम्ही मंगेशकर कुटुंबीयांनी कधीही या वादात भाग घेण्याचे कारण नाही. कारण आमची ती इच्छा नाही. लतादीदीचे स्मारक हे शिवाजी पार्कात व्हावे ही आमची इच्छा नाही. उलट शिवाजी पार्कात दीदींच्या स्मारकावरून जो राजकारणी लोकांचा वाद चालला आहे, तो वाद त्यांनी कृपया बंद करावा. दीदींच्या बाबतीत कृपया राजकारण करू नका.

महाराष्ट्र शासनाने लता मंगेशकर संगीत विद्यालयाची स्थापना करण्याचे दीदीला आश्वासन दिले होते. ती विनंती स्वतः लतादीदींनी उद्धव ठाकरेंना केली होती. मुख्यमंत्री उदय सामंत, आदित्य ठाकरे यांनी ही विनंती अतिशय आनंदाने मान्य केली होती. दीदीच्या नावे एक संगीत स्मारक होते आहे, त्यापेक्षा अन्य कोणतेही मोठे स्मारक होऊ शकत नाही. श्रद्धेला श्रद्धांजली वाहण्याची आवश्यकता नसते. लता मंगेशकर गेल्याने एक संगीत पर्व संपले आहे, एक युगांत झाला आहे.

- Advertisement -

लतादिदींच्या अस्थींचे रामकुंडात विसर्जन

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -