घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रलतादिदींच्या अस्थींचे रामकुंडात विसर्जन

लतादिदींच्या अस्थींचे रामकुंडात विसर्जन

Subscribe

गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या अस्थींचे गुरुवारी (दि.१०) सकाळी ११.३० वाजता विसर्जन रामकुंडाजवळील अस्थीविलय कुंडामध्ये करण्यात आले. लतादिदींच्या अस्थी विसर्जनासाठी नागरिकांनी रामकुंडावर गर्दी केली होती. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नार्वेकर, आदिनाथ मंगेशकर, वैजनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, कृष्णा आदिनाथ मंगेशकर, मयुरेश पै आदी उपस्थित होते.

लता मंगेशकर यांचे रविवारी (दि.६) निधन झाले. त्यांच्यावर शिवाजी पार्क मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अस्थी घेऊन मंगेशकर कुटुंबिय गुरुवारी सकाळी विशेष विमानाने मुंबईहून ओझर विमानतळावर आले. त्यानंतर ते कारने सकाळी १० वाजेदरम्यान रामकुंडावर आले. अस्थी विसर्जनासाठी महापालिकेच्या वतीने रामकुंडावर शामियाना उभारुन पूजनाची व्यवस्था करण्यात आली होती. उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर यांचा मुलगा आदिनाथ मंगेशकर व इतर कुटुंबियांनी शास्त्रोक्त पद्धतीने विधीवत कलश पूजन केले. यावेळी सात पुरोहितांनी मंत्रोच्चार केला. त्यानंतर सकाळी ११.१० वाजता अस्थींचे विसर्जन कुंडात करण्यात आले. लतादिदींचे भाचे आदिनाथ मंगेशकर यांनी सर्व विधी पार पाडले. मंगेश घराण्याचे उपाध्ये वेदमूर्ती शांतारामशास्त्री भानोसे व गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांच्या मार्गदर्शनाखाली कलशपूजनासह धार्मिक विधी करण्यात आले. जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, प्रशांत जुन्नरे, माजी मंत्री बबनराव घोलप यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार सुहास कांदे, माजी आमदार बबनराव घोलप, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर अजय बोरस्ते, नगरसेवक विलास शिंदे, विनायक पांडे, वसंत गिते, सुनील बागुल, दत्ता गायकवाड यांच्यासह राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -