घरमहाराष्ट्रमंजुळेंनी बदलीच्या बाबतीत तुकाराम मुंढेनाही मागे टाकलं! ८ महिन्यांत ३ बदल्या!

मंजुळेंनी बदलीच्या बाबतीत तुकाराम मुंढेनाही मागे टाकलं! ८ महिन्यांत ३ बदल्या!

Subscribe

२००९ बॅचचे आयएएस अधिकारी बालाजी मंजुळे यांनी बदल्यांच्या बाबतीत तुकाराम मुंढेंना देखील मागे टाकले असून गेल्या ८ महिन्यांत त्यांच्या ३ वेळा बदली झाल्या आहेत.

कडक शिस्तीचे आणि राजकारण्यांना न जुमानणारे म्हणून ख्याती असलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे याची १२ वर्षांत १३ वेळा बदली झाली. त्यांच्या कामगिरीपेक्षाही त्यांच्या बदल्यांचीच जास्त चर्चा झाली. मात्र आता २००९ सालच्या आयएएस बॅचचे अधिकारी बालाजी मंजुळे यांनी तर मुंढेंनाही मागे टाकलं आहे. गेल्या ८ महिन्यांत त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. त्यामुळे एका पोस्टिंगवर सरासरी १ वर्ष काढणाऱ्या तुकाराम मुंढेंपेक्षाही बालाजी मंजुळे यांचा कार्यकाल कमी म्हणजे अडीच ते तीन महिन्यांवर आला आहे. पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्याशी न पटल्यामुळेच मंजुळेंच्या बदली होत असल्याचं सांगितलं जात आहे.

आन्ध्र प्रदेशातील नेतेमंडळींनाही मंजुळेंचा इंगा!

२००९साली बालाजी मंजुळे युपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस अधिकारी झाले होते. वडार समाजातले ते पहिले आयएएस आहेत. दगड फोडण्यासारखं कष्टाचं काम करणाऱ्या आई-वडिलांच्या मुलाने प्रचंड जिद्दीच्या आणि मेहनतीच्या जोरावर मिळवलेलं यश तेव्हा सर्वांच्याच कौतुकासाठी पात्र ठरलं होतं. त्यांचा एक डोळा पूर्णपणे निकामी असून दुसऱ्या डोळ्याची दृष्टी देखील कमी आहे. मात्र तरीदेखील त्यांनी हे यश मिळवलं. त्यानंतर त्यांना नोकरीसाठी आन्ध्र प्रदेश कॅडर देण्यात आलं होतं. तिथल्या नेत्यांना देखील मंजुळेंनी त्यांच्या कडक कारभाराचा इंगा दाखवल्यामुळे तिथली नेतेमंडळी त्यांच्यावर नाराज होती.

- Advertisement -

हेही वाचा – तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली! नक्की चाललंय तरी काय?

बदली…परत बदली…आणि पुन्हा बदलीच!

प्रतिनियुक्तीवर २०१९मध्ये मंजुळे आन्ध्र प्रदेशातून महाराष्ट्रात आले. त्यांना वर्षाच्या सुरुवातीला अपंग कल्याण आयुक्त म्हणून पदभार सोपवण्यात आला. पण अवघ्या पावणे दोन महिन्यांतच त्यांची बदली नंदुरबारच्या जिल्हाधिकारी पदी करण्यात आली. खुद्द जयकुमार रावल यांनीच कार्यक्षम अधिकारी म्हणून त्यांना नंदुरबारच्या जिल्हाधिकारीपदी आणावे अशी शिफारस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. पण फेब्रुवारी महिन्यात नंदुरबारला आलेल्या मंजुळेंची पाचच महिन्यांत पुन्हा बदली करून त्यांना पुण्यातल्या आदिवासी प्रशिक्षण संस्थेत पाठवण्यात आलं. पण तिथूनही त्यांची दोनच महिन्यांत पुन्हा बदली होऊन त्यांना नियोजन विभागात उपसचिव पदावर रुजू होण्यास सांगण्यात आले आहे.

दोनच महिन्यांत ‘कार्यक्षमता’ दिसेनाशी कशी झाली?

खरंतर एखाद्या जिल्ह्यामध्ये भरीव कामगिरी करण्याची इच्छा मंजुळेंनी अनेकदा बोलून दाखवली जात आहे. मात्र, त्यांना कुठेही फार काळ सेवा देता येत नसल्यामुळे भरीव कामगिरी करण्याची त्यांची इच्छा अजूनही पूर्ण होऊ शकलेली नाही. शिवाय, ज्या कार्यक्षमतेच्या हवाल्याने जयकुमार रावल यांनी मंजुळेंना नंदुरबारमध्ये आणलं होतं, तीच कार्यक्षमता अवघ्या दोनच महिन्यांत दिसेनाशी होऊन पुन्हा त्यांची बदली का करण्यात आली? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. नाराज जयकुमार रावल यांनीच मंजुळेंच्या बदलीसाठी ‘हातभार’ लावला असावा, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. तुकाराम मुंढे यांनी सोलापूर जिल्हाधिकारी, नवी मुंबई पालिका आयुक्त आणि नाशिक पालिका आयुक्तपदी अनेक लोकोपयोगी धोरणात्मक निर्णय घेतले. मात्र, त्यांनी घेतलेले निर्णय राज्यकर्त्यांना अडचणींचे ठरल्याने त्यांची काही महिन्यातच बदली करण्यात आली. सध्या मुंढे महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेत प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -