Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र खरंतर हीच ती गद्दार वृत्ती! 'त्या' व्हिडीओवरून आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा

खरंतर हीच ती गद्दार वृत्ती! ‘त्या’ व्हिडीओवरून आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा

Subscribe

मुंबई : मराठा आरक्षणासाठी जालना येथे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल राज्य सरकारने सोमवारी सर्वपक्षीयांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मात्र, हा विरोधकांचा खोडसाळपणा असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. तर, हीच ती गद्दार वृत्ती, असे म्हणत ठाकरे गटाचे आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

मराठा आरक्षणासाठी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे पाटील हे आपल्या सहकाऱ्यांसह बेमुदत उपोषणाला बसले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सोमवारी संध्याकाळी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती सर्वपक्षीय नेत्यांनी केली आहे. याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका पत्रकार परिषदेतून दिली.

हेही वाचा – आरक्षण देण्याची दानत नसेल तर तसे सांगा, पण किमान… ‘त्या’ व्हिडीओवरून ओमराजेंची टीका

- Advertisement -

मात्र, ही पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी मुख्यमंत्री आणि दोन उपमु्ख्यमंत्र्यांमध्ये झालेल्या संवादाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. तर, मुख्यमंत्री शिंदे यांनी ट्वीट करत, या व्हिडीओसाठी विरोधकांवर ठपका ठेवला आहे. शासनाने चांगली भूमिका घेतली असताना मुद्दामहून काही विरोधक खोडसाळपणे आणि व्हिडीओ क्लिप चुकीच्या पद्धतीने संपादित करून लोकांच्या मनात गैरसमज पसरविण्याचे काम करीत आहेत हे अतिशय निंदनीय असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

तथापि, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावरून शिंदे-फडणवीस सरकारवरच टीका केली आहे. ही यांची मराठा आंदोलकांबद्दलची संवेदनशीलता? खरंतर हीच ती गद्दार वृत्ती! गेले दीड वर्ष महाराष्ट्र या गद्दार गॅंगच्या भूलथापा ऐकून घेत आहे. या मिंधे-भाजपा सरकारवर मराठा समाज तर सोडाच पण देशातील एक तरी नागरिक विश्वास ठेवेल का? असा सवाल त्यांनी केला आहे.

हेही वाचा – व्हिडीओ क्लिप चुकीच्या पद्धतीने संपादित करून…, मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांचा केला निषेध

तुरुंगात जायचे नाही आणि मुख्यमंत्रीपदावर बसायचे म्हणून ज्यांनी यांना घडवले, वाढवले, पदे दिली, सत्ता दिली त्यांचे नाही होऊ शकले, तर हे महाराष्ट्राचे काय होणार? दुर्दैव आहे आमच्या राज्याचे की, गद्दारी करून हे असले खोके-धोके सरकार महाराष्ट्रातल्या नागरिकांवर लादले गेले आहे, अशी कठोर टीका त्यांनी केली आहे.

- Advertisment -