घरमहाराष्ट्रनागपूर अधिवेशन : विरोधक आक्रमक, रडारवर फक्त आणि फक्त शिंदे गटातील मंत्री!

नागपूर अधिवेशन : विरोधक आक्रमक, रडारवर फक्त आणि फक्त शिंदे गटातील मंत्री!

Subscribe

मुंबई : नागपूरमधील हिवाळी अधिवेशन सध्या आरोप-प्रत्यारोपाने गाजत आहे. पण विशेष म्हणजे, विरोधकांच्या रडारवर प्रामुख्याने शिंदे गटातील मंत्रीच असल्याचे पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य चार मंत्र्यांवर गैरप्रकाराचे आरोप करण्यात आले आहेत. तर, अन्य एका मंत्र्यावर शिविगाळ आणि मारहाणीचा आरोप आहे.

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली तेव्हा महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद गाजण्याची चिन्हे होती. पण नंतर विरोधकांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भूखंड गैरव्यवहाराचा आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. नागपूर सुधार प्रन्यासची 86 कोटींची जमीन तत्कालीन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी अवघ्या दोन कोटीत बिल्डरांना विकल्याचा आरोप करण्यात आला आहे.

- Advertisement -

अब्दुल सत्तारांचे गायरान जमीन प्रकरण
त्यानंतर कृषीमंत्री अब्दुल सत्तार विरोधकांच्या निशाण्यावर आले. 37 एकर 19 गुंठे गायरान जमिनीचे एका व्यक्तीला अनधिकृतरित्या वाटप केल्याचा आरोप करत विरोधकांनी सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यापाठोपाठ अन्न व औषध प्रशासनमंत्री संजय राठोड यांचे देखील असेच एक गायरान जमिनीचे प्रकरण समोर आले आहे. विशेष म्हणजे दोन्ही प्रकरणे वाशिम जिल्ह्याशी संबंधित आहेत.

उदय सामंतांची मेगा प्रोजेक्टला मंजुरी
तर दुसरीकडे, मेगा प्रोजेक्टप्रकरणी उद्योगमंत्री वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्हे आहेत. अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीरामपूर तालुक्यात टिळकनगर इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीची 210 कोटींची गुंतवणूक आहे. तसेच याच कंपनीची रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात 82 कोटींची गुंतवणूक आहे. मेगा प्रोजेक्ट दाखवण्यासाठी अहमदनगर आणि रत्नागिरी असे जिल्हे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी क्लब केले आणि दोन्ही ठिकाणची एकत्रित 292 कोटी रुपयांची गुंतवणूक दाखवून टिळकनगर इंडस्ट्रीचा प्रस्ताव शिंदे सरकारने 2 महिन्यांपूर्वी संमत केला असल्याचे सांगण्यात येते.

- Advertisement -

शंभूराज देसाईंचे अनधिकृत बांधकाम
राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी महाबळेश्वरनजीकच्या नावली येथे शेतजमिनीवर अवैध बांधकाम केलेले आहे. निवडणूक शपथपत्रात या जमिनीचा शेतजमीन म्हणून उल्लेख आहे, परंतु प्रत्यक्षात या जमिनीवर निवासी बांधकाम केलेले आहे. निवडणूक शपथपत्रात या जागेवर घराचे बांधकाम असल्याचा उल्लेख आहे. मात्र सातबारा उताऱ्यावर घराच्या बांधकामाचा उल्लेख नाही, असे सांगत त्यांना अपात्र ठरवता येईल, अशी भूमिका ठाकरे गटाने घेतली आहे.

दादा भुसेंचे मारहाण प्रकरण
बंदरे व खनिकर्ममंत्री दादा भुसे यांनी दोघांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी हा व्हिडीओ ट्विटरवरून शेअर केला आहे. मंत्री दादा भूसे फटकावतात, शिव्या देतात. आता मुख्यमंत्री साहेब कुठला गुन्हा पोलीस घेणार, असा सवाल आव्हाड यांनी केला आहे. तथापि, हा व्हिडीओ कुठला आणि कधीचा आहे, हे स्पष्ट झालेले नाही.

राहुल शेवाळे एसआयटीच्या फेऱ्यात
शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे हे देखील एका महिलेच्या बलात्कार आणि फसवणूक प्रकरणी विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) फेऱ्यात अडकले आहेत. लग्नाचे आमिष दाखवून खासदार राहुल शेवाळे यांनी आपले मानसिक आणि शारीरिक शोषण केल्याचा आरोप दुबईतील एका व्यापारी महिलेने केला होता. त्याप्रकरणी ही चौकशी होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -