घरमहाराष्ट्रदहीहंडीतील पहिली दु:खद घटना : विलेपार्लेतील जखमी गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

दहीहंडीतील पहिली दु:खद घटना : विलेपार्लेतील जखमी गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

Subscribe

मुंबई : दहीहंडी फोडताना जखमी झालेल्या एका 22 वर्षीय गोविंदाचा सोमवारी उपचरादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. संदेश दळवी असे या गोविंदाचे नाव आहे. विलेपार्ले येथील शिवशंभो पथकातील हा गोविंदा होता. यंदाच्या दहीहंडी उत्सवातील या पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे.

- Advertisement -

दहीहंडी उत्सवाच्या दिवशी शुक्रवारी बामणवाडा परिसरातील दहीहंडी फोडताना संदेश सहाव्या थरावरून खाली कोसळला होता. यावेळी गंभीर जखमी झालेल्या संदेशला तातडीने आधी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु प्रकृती अधिक खालावल्याने त्याला नानावटी रुग्णालयात हलवण्यात आले. याच रुग्णालयात सोमवारी रात्री त्याचे निधन झाले. हे दळवी कुटुंब आधी विलेपार्ले येथे राहात होते. ते आता कुर्ल्याला राहायला गेले होते. तीन भावंडांमध्ये संदेश हा सर्वात लहान होता. अत्यंत कमी वयात दळवी कुटुंबातील मुलाचे निधन झाल्यामुळे दळवी कुटुंबाला सरकारकडून आर्थिक मदत मिळण्याची अपेक्षा आहे.

कोरोनाचे संकट दूर झाल्यामुळे शिंदे सरकारने सर्व सण उत्सवावरील निर्बंध हटवले आहेत. तब्बल 2 वर्षांनी साजरा होणार्‍या दहीहंडी उत्सवात यंदा मोठ्या संख्येने तरूण सामील झाले होते. मुंबई-ठाण्यासह राज्यभरात दहीहंडीचा जल्लोष दिसून आला. दहीहंडी उत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी शिंदे सरकारने दहीहंडीला साहळी खेळाचा दर्जा देत पुढील वर्षीपासून प्रो कबड्डीच्या धर्तीवर प्रो-दहीहंडीचे आयोजन करण्याची घोषणा केली. एवढेच नाही, तर गोविंदांना 5 टक्के क्रीडा कोट्यातून शासकीय नोकरीत देण्याचे आश्वासनही दिले आहे. यासंबंधीचा शासन अध्यादेश सरकार कधी काढणार याकडे तरूणांचे लक्ष आहे.

- Advertisement -

गोविंदांसाठी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणा
दहीहंडी खेळणार्‍या गोविंदांना तात्काळ विम्याची सुरक्षा देणे शक्य नसल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जखमी गोविंदांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार मनोरे रचताना गोविंदा पथकातील खेळाडूचा दहीहंडीच्या थरावरून पडून मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसास 10 लाख रुपये, दहीहंडीच्या थरावरून प्रत्यक्ष पडून दोन्ही डोळे अथवा दोन्ही हात, दोन्ही पाय अथवा कोणतेही महत्त्वाचे 2 अवयव निकामी झाल्यास त्याला 7 लाख 50 हजारांची मदत, दहीहंडीच्या थरावरून पडल्याने एक हात किंवा एक पाय किंवा कोणताही एक महत्त्वाचा अवयव निकामी झाल्यास किंवा गंभीर इजा झाल्यास 5 लाख रुपयांची मदत यांचा समावेश आहे.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -