घरताज्या घडामोडीखडसेंचे पुनर्वसन शरद पवारच करतील; कोणत्याही मंत्र्यांचा राजीनामा घेणार नाही - जयंत...

खडसेंचे पुनर्वसन शरद पवारच करतील; कोणत्याही मंत्र्यांचा राजीनामा घेणार नाही – जयंत पाटील

Subscribe

भाजपचे माजी नेते एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देण्याच्या एक दिवस आधी मुंबई येथे शरद पवार यांनी पक्षाच्या काही निवडक नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले की, “एकनाथ खडसे यांचा मंत्रिमंडळात प्रवेश देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याबाबत शरद पवारच निर्णय घेतील. त्यामुळे इतरांनी त्याची चिंता करण्याची गरज नाही. तसेच राष्ट्रवादीच्या कोणत्याही मंत्र्यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, त्यामुळे उगाच राजीनाम्याच्या अफवा पसरवू नका.”

जयंत पाटील पुढे म्हणाले की, आगामी काळात विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका होणार आहेत. त्याबद्दल चर्चा करण्यासाठी शरद पवार यांनी बैठक बोलावली होती. आज आमची प्राथमिक चर्चा झाली. पुढच्या आठवड्यात सोमवार किंवा मंगळवारी महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांची चर्चा होईल. शिवसेनेचे नेते सुभाष देसाई आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात या दोघांशीही याबाबत मी बोलणार आहे, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.

- Advertisement -

एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्यामुळे महाराष्ट्रातील सध्याची ही सर्वात मोठी राजकीय घडामोड मानली जात आहे. मात्र या पक्षप्रवेशाच्या सोहळ्याला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार उपस्थित राहणार नाहीत. याबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, अजित पवार यांना थोडा सर्दीचा त्रास जाणवत आहे. त्यांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे का? याबाबत अद्याप माझ्याकडे माहिती नाही. मात्र डॉक्टरांनी त्यांना आराम करण्यास सांगितले असल्यामुळे ते उद्या उपस्थित राहणार नाहीत, असे पाटील म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -