घरमहाराष्ट्र'घोडे बाजार' म्हणजे काय? भारतीय राजकारणात याची इतकी चर्चा का होते?

‘घोडे बाजार’ म्हणजे काय? भारतीय राजकारणात याची इतकी चर्चा का होते?

Subscribe

महाराष्ट्रातही विधान परिषदेच्या निवडणुकीवरून सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्ष एकमेकांवर घोडे बाजार करत असल्याचे आरोप करत आहेत.

देशातील कोणत्याही राज्यात निवडणुका होतात आणि सरकार स्थापनेची कसरत जोरात सुरु होते तेव्हा राजकीय पक्ष एकमेकांवर घोडे बाजार केल्याचा आरोप करतात. यात प्रत्येक पक्ष आपल्या आमदारांना त्यांच्या घरापासून लांब एका सुरक्षित ठिकाणी एकत्र करतात. यात महाराष्ट्रातही विधान परिषदेच्या निवडणुकीवरून सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्ष एकमेकांवर घोडे बाजार करत असल्याचे आरोप करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रासह राजस्थान, कर्नाटक आणि मध्य प्रदेशात घोडे बाजाराच्या घटनांना उत आला आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीमुळे राजकीय पक्षांकडून याच गोष्टीची पुनरावृत्ती होत आहे. भाजप, शिवसेना आणि काँग्रेस या पक्षांनी आपल्या आमदारांना अनेक राज्यांमध्ये एकत्र रिसॉर्टमध्ये ठेवले आहे. राजकीय पक्ष असे का करतात हे तुम्हाला माहीत आहे? तसेच हा घोडे बाजार म्हणजे काय? भारतीय राजकारणात हा शब्द कसा वापरात आला? याबाबतची माहिती तुम्हाला आज सांगणार आहोत…

घोडे बाजार म्हणजे काय?

घोडे बाजारचा शाब्दिक अर्थ घोड्यांचा व्यापार असा होतो. पण इथे घोडा विकतही घेतला जात नाही किंवा विकला जात नाही. केंब्रिज डिक्शनरीनुसार, “घोडे बाजार” हा शब्द कोणत्याही दोन पक्षांनी चतुराईने केलेला करार असा होतो, यात दोन्ही पक्ष एकमेकांच्या फायद्यासाठी काहीतरी निर्णय घेतात, अमिषं दाखवतात. भारतीय राजकारणात जेव्हा जेव्हा अशी परिस्थिती उद्भवते तेव्हा राजकारणी त्याला ‘हॉर्स ट्रेडिंग’ म्हणजेच घोडे बाजार असं म्हणतात.

- Advertisement -

घोडे व्यापार हा शब्द केव्हा प्रचलित आला?

घोडे बाजार हा शब्द 1820 च्या आसपास वापरात दिसून आला. मात्र तेव्हा या शब्दाचा राजकारणाशी काहीही संबंध नव्हता तर घोडे खरेदी आणि विक्रीसाठी हा शब्द वापरला जायचा. त्या काळात घोडे पाळणारे आणि घोडे विकत घेणारे वेगळे असायचे. त्यांच्यामध्ये काही मध्यस्थ अर्थात व्यापारी होते, ते व्यापारी काही कमिशन घेऊन घोडे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी विकत असत. पण हळूहळू या व्यवहारात एक फसवणूक समोर येऊ लागली. घोडे विकणारे व्यापारी किंवा मध्यस्थ अधिक नफा मिळविण्यासाठी काही चांगल्या जातीचे घोडे लपवून ठेवायचे. यानंतर हे घोडे छुप्या पद्धतीने फसवणूक करत विकले जायचे आणि जास्त पैसे कमवायचे.

राजकारणातील घोडेबाजार म्हणजे काय?

राजकारणातील घोडेबाजार हा पक्षाचे सरकार बनवण्यासाठी किंवा पाडण्यासाठी केला जातो. यामध्ये राजकीय पक्ष एकमेकांच्या पक्षातील सदस्यांना पैसा, पद, प्रतिष्ठा यांचे आमिष दाखवून आपल्यात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करतात. राजकारणात या डीलला हॉर्स ट्रेडिंग म्हणतात.

- Advertisement -

भारतीय राजकारणातील घोडे बाजाराचे मोठे उदाहरण हरियाणाच्या राजकारणात पाहायला मिळते. 1967 मध्ये हरियाणाच्या पलवल जिल्ह्यातील हसनपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार झालेले गयालाल यांनी एकाच दिवसात तीनदा पक्ष बदलला. काँग्रेसचा हात सोडून जनता पक्षात प्रवेश करून त्यांनी दिवसाची सुरुवात केली. त्यानंतर काही वेळात काँग्रेसमध्ये परतले. तब्बल 9 तासानंतर त्यांचे मनपरिवर्तन झाले आणि ते पुन्हा जनता पक्षात गेले. त्यानंतर पुन्हा गयालाल यांचे मनपरिवर्तन झाले आणि ते पुन्हा काँग्रेसमध्ये आले. यानंतर काँग्रेसचे तत्कालीन नेते राव बिरेंद्र सिंह त्यांच्यासोबत चंदीगढला पोहोचले आणि त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

“आया राम गया राम” हा शब्दही इथून प्रचलित झाला

यावेळी राव बिरेंद्र यांना एका पत्रकार परिषदेत ‘गया राम अब आया राम हैं’ हा शब्द वापरला होता. या घटनेनंतर ‘आया राम, गया राम’ हा शब्द केवळ भारतीय राजकारणातच नव्हे तर सामान्य जीवनातही मार्ग बदललेल्या किंवा पक्षांतर करणाऱ्यांसाठी वापरला जाऊ लागला.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -