घरमहाराष्ट्रश्रीवर्धनमध्ये दरडीचा धोका

श्रीवर्धनमध्ये दरडीचा धोका

Subscribe

मुसळधार पावसामुळे शहरातील गणेश आळीच्या उत्तर विभागास दरडींचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे 11 जीर्ण इमारतींच्या मालकांना नगरपालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. डोंगराळ भागावरील दरड कोसळल्याचे वृत्त समजल्यानंतर नगराध्यक्ष नरेंद्र भुसाणे, तहसीलदार, मुख्याधिकारी व अन्य अधिकार्‍यांनी पाहणी केली. आळीत 150 घरांची वस्ती आहे. त्यापैकी 7 ते 8 घरांना दरडीचा धोका मोठ्या स्वरूपात निर्माण झाला आहे. हा धोका लक्षात घेऊन नगर पालिका प्रशासनाने तेथील नागरिकांना शाळा क्रमांक 1 व पर्यटन निवासाची वास्तू तात्पुरत्या स्वरुपात राहण्यासाठी उपलब्ध करून दिली आहे.

परंतु दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नसल्याने ती चिंतेची बाब ठरत आहे. शहरातील जीर्ण अवस्थेतील 11 इमारतींच्या मालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यामध्ये मधला कोळीवाडा, मुकादम भाट, वेताळ पाखाडी, चौकर पाखाडी, साळीवाडा, शिवाजी चौक, सिद्धार्थ नगर, ओजाळे पाखाडी, वरचा जिवना व रफी अहमद किडवई मार्गावरील इमारतींचा समावेश आहे.

- Advertisement -

नगर पालिका गणेश आळीतील जनतेच्या सोबत आहेत. पालिकेने त्यांच्या सुरक्षेचे दायित्व स्वीकारले असून दरड प्रवण क्षेत्रातील लोकांच्या राहण्याची पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.
-नरेंद्र भुसाणे, नगराध्यक्ष

गणेश आळीच्या उत्तर विभागातील 7 ते 8 घरांना दरडीचा धोका आहे. गेल्यावर्षीच्या पावसातसुद्धा संबंधित घरांना काही स्वरूपात हानी पोहचली होती. यावर्षी पावसाचे प्रमाण जास्त असल्याने त्या ठिकाणच्या लोकांनी कुठलाही धोका स्वीकारू नये.
-अनंत गुरव, नगरसेवक

- Advertisement -

दरड प्रवण क्षेत्रातील लोकांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केली आहे. तात्पुरत्या स्वरुपात निवासाची सोय केली असून, सर्वांनी सहकार्य करावे.
-किरणकुमार मोरे, मुख्याधिकारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -