घरमहाराष्ट्ररोहे तालुक्यात दरड कोसळली

रोहे तालुक्यात दरड कोसळली

Subscribe

रोहे तालुक्यात शुक्रवार 28 जुन पासून मान्सूनने महिनाभराच्या प्रतिक्षेनंतर हजेरी लावली. तेव्हापासून शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पाऊस पडत आहे. वरसे, भुवनेश्वर पाण्याखाली जाण्याच्या सावटाखाली असताना कुंडलिका नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे. त्यामध्येच सोमवारी रात्री रोहे केळघर मार्गे मुरुड मार्गावर दरड कोसळण्याची घटना घडली आहे.

रोह्यापासून 15 किलोमीटरच्या अंतरावर आलेल्या , केळघर मार्गावरील कवळठे गावाजवळ हि घटना घडली आहे. रात्री 11 च्या दरम्यान पोलीस नियंत्रण कक्षा कडून रोहे तहसील कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षात तांबडीभागात दरड कोसळल्याची माहिती देण्यात आली. त्या वेळी कर्तव्यावर असलेले तलाठी मारुती मळेकर व कोतवाल विशाल पाताडे, सुनील मोरे,निलेश कुंडे यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे शाखा अभियंता शेख यांना दरड कोसळ्याची माहिती दिली. तात्काळ हे सर्व पथक घटना स्थळाकडे रवाना झाले. रात्रीच्या वेळी असणारा अंधार व त्यामध्ये पडणारा मुसळधार पाऊस यामुळे रस्त्यावरील दरड हटविण्यात अडथळे येत होते.

- Advertisement -

रोह्यातून मुरुडकडे जाण्यासाठी रोहे भालगाव मार्गे मुरुड व रोहे केळघर मार्गे मुरुड असे दोन मार्ग आहेत . या मधील केळघर मार्गे मुरुड हा मार्ग डोंगराळ भागातून गेलेला आहे. या मार्गावर तांबडी, कवळठे, केळघर साठलेवाडी, कांटि, बोडण आदी गावे येतात. मुरुडकडे जाण्यासाठी हा मार्ग जवळचा असल्यामुळे पर्यटक याच मार्गाचा वापर करण्यास प्राधान्य देतात. राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्यांसह अन्य वाहनांची वर्द्ळ या मार्गावर असते. अशा या दुर्गम भागातील मार्गावर गेले तीन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सोमवारी रात्री दरड कोसळण्याची घटना घडली.

ही घटना रात्रीच्या वेळी घडल्याने कोणतीही जीवित वा वित्तीय हानी झाली नाही. मंगळवारी सकाळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता घाडगे, शेख यांनी एक जेसीबी यंत्र व डंपर यांचे साहाय्याने रस्त्यावरील दरड व रस्त्यालगत पडलेली झाडे हटविण्यास सुरवात केली. त्यांचे सोबत अन्य सात कर्मचारी सोबतीला होते. त्यानंतर एका बाजूने वाहतूक सुरु केली. त्यामुळे वाहनचालकाना याचा कोणताही त्रास सहन करावा लागला नाही. दुपारी बारा वाजेपर्यंत रस्त्यावर आलेली माती, दगड व झाडी झुडपे हटवून हा रस्ता वाहतूकीसाठी पूर्णपणे मोकळा करण्यात आला.

- Advertisement -

घटनेची माहिती मिळताच रोहे प्रांताधिकारी रवींद्र बोंबले यांनी घटना स्थळी भेट देत पाहणी केली. यावेळी मार्ग प्रवासी व वाहनचालकांसाठी लवकरात लवकर सुरु होण्यासाठी आवश्यक त्या सूचना सहकारी अधिकारी,कर्मचाऱ्यांना दिल्या. तर दुसरी कडे कोलाड येथील पाले खुर्द येथील गावानजीक असलेला डोंगराच भाग कोसळला असता तलाठी यांना कळवून देखील कोणतीही दखल न घेतल्याचे तेथील ग्रामस्थ महेश ठाकूर यांनी सांगितले. पाले येथील अजून काही डोंगराळ भाग हा कोसळण्याची परिस्थितीत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -