घरमहाराष्ट्रLok Sabha 2024 : भ्रमिष्ट ठाकरेंनी आधी ठरवावे कोणी शब्द दिला..., देवेंद्र...

Lok Sabha 2024 : भ्रमिष्ट ठाकरेंनी आधी ठरवावे कोणी शब्द दिला…, देवेंद्र फडणवीसांचा पलटवार

Subscribe

उद्धव ठाकरे यांनी आधी ठरवावे की अमित शहा यांनी शब्द दिला की देवेंद्र फडणवीस यांनी! याचाच अर्थ, मी मुख्यमंत्री होईन किंवा माझा मुलगा मुख्यमंत्री होईल, असा केवळ आपल्या परिवाराचाच विचार केला, असा पलटवार फडणवीस यांनी केला आहे.

अमरावती : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यात दावे-प्रतिदावे केले जात आहेत. तर दुसरीकडे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. आमचे जुने मित्र उद्धव ठाकरे हे भ्रमिष्ट झाले आहेत, असा पलटवार फडणवीस यांनी केला आहे.

सन 2019च्या निवडणुकीपूर्वी एका बंद खोलीत भाजपाचे दिग्गज नेते आणि विद्यमान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्याला मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता. पण निवडणूक निकालानंतर तो त्यांनी पाळला नसल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. त्यानंतर त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेत सरकार स्थापन केले. मात्र भाजपाने उद्धव ठाकरे यांचा हा आरोप फेटाळला.

- Advertisement -

तर, आता ‘द इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्रीपदाबाबतचा शब्द पाळला नसल्याचा आरोप केला आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री करेन, असे वचन मी माझ्या वडिलांना दिले होते. त्यानुसार, प्रत्येकी 2.5 वर्षे शिवसेना आणि भाजपाचा मुख्यमंत्री असेल, याबद्दल अमित शहा यांच्यासमवेत सहमती झाली होती. शिवाय देवेंद्र फडणवीसही म्हणाले होते की, आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवेन आणि मी स्वतः दिल्लीला जाईन. पण फडणवीस यांनी मला माझ्याच लोकांसमोर खोटे ठरवले, असा दावा त्यांनी केला.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : केवळ अमित शहाच नव्हे तर, फडणवीसांनीही शब्द फिरवला, ठाकरेंचा आरोप

- Advertisement -

अमरावती येथील जाहीरसभेत याला प्रत्युत्तर देताना फडणवीस यांनी ठाकरे यांची घराणेशाही असल्याकडे लक्ष वेधले आहे. ते म्हणाले की, आमचे जुने मित्र भ्रमिष्ट झाले आहेत, असे मला वाटते. बंद खोलीत अमित शहा यांनी आपल्याला मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता, असे ते आतापर्यंत सांगत होते. तर आता, मी आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री बनविण्याचा शब्द दिला होता, असे ते सांगत आहेत. त्यांना वेड लागले असेल, मला तर लागले नाही ना! मी फक्त आदित्य ठाकरे यांना ट्रेनिंग देण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा सल्ला दिला होता. त्यांना मुख्यमंत्री काय, केवळ मंत्री करण्याचाही विचार त्यावेळी नव्हता, असे ते म्हणाले.

उद्धव ठाकरे यांना कालपर्यंत भ्रम होता की, अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याचा शब्द दिला होता. तर, आज ते सांगत आहेत की, फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करून आपण स्वत: दिल्लीला जात असल्याचे म्हटले होते. उद्धव ठाकरे यांनी आधी ठरवावे की अमित शहा यांनी शब्द दिला की देवेंद्र फडणवीस यांनी! याचाच अर्थ, मी मुख्यमंत्री होईन किंवा माझा मुलगा मुख्यमंत्री होईल, असा केवळ आपल्या परिवाराचाच विचार केला, असा पलटवार त्यांनी केला आहे.

Lok Sabha 2024 : अमित शहा अध्यक्ष बनल्यावर भाजपाची चाल बदलली, उद्धव ठाकरेंचा दावा


Edited by – Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -