घरमहाराष्ट्रमहाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर

महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर

Subscribe

राज्यात १८,४६६ नवे रुग्ण, मुंबईत ओलांडला 10 हजारांचा टप्पा

राज्यात मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, नाशिक या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यातच राज्यामध्ये मंगळवारी 18,466 नवे रुग्ण सापडले आहेत. यामध्ये मुंबईमध्ये सर्वाधिक 10,860, ठाणे 1354, पुणे 1113, नाशिक 308 आणि नागपूर 192 या महानगरांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता लॉकडाऊन संदर्भातील निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज बुधवारी विशेष बैठक घेण्यात येणार आहे.

राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून, रुग्णांची संख्या 20 हजारांच्या जवळपास पोहोचली आहे तर मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येने 10 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. राज्यात मंगळवारी १८,४६६ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६७,३०,४९४ तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ६६,३०८ इतकी झाली आहे. राज्यात मंगळवारी २० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून मृतांची संख्या 1,41,573 इतकी झाली आहे. राज्यातील मृत्यूदर २.१ टक्के एवढा आहे. त्याचप्रमाणे मुंबईतही मंगळवारी 10 हजार 860 कोरोना रुग्ण सापडले आहेत. यामध्ये लक्षणे नसलेल्यांची संख्या 9,665 इतकी म्हणून एकूण रुग्णांपैकी 89 टक्के इतकी आहे.

- Advertisement -

मुंबईत मंगळवारी रुग्णालयात दाखल झालेल्या 834 रुग्णांपैकी 52 रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता लागली आहे. राज्यात मंगळवारी ४,५५८ रुग्ण बरे झाले असून, आजपर्यंत एकूण ६५,१८,९१६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८६ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,९५,०९,२६० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६७,३०,४९४ (९.६८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३,९८,३९१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १११० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मंत्री कोरोनाबाधित झाल्याने राज्य मंत्रिमंडळाची आजची बैठक झाली रद्द

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री कोरोनाबाधित झाल्याने आज, बुधवारची नियोजित राज्य मंत्रिमंडळाची बैठक रद्द करण्यात आली आहे.

- Advertisement -

आठवड्यात दर बुधवारी किंवा गुरुवारी मंत्रिमंडळाची बैठक होते. कोरोना संसर्गापासून ही बैठक मंत्रालयाऐवजी मलबार हील येथील सह्याद्री अतिथीगृहात होत होती. तसेच शस्त्रक्रियेमुळे मुख्यमंत्री दूरदृश्य प्रणालीद्वारे मंत्रिमंडळ बैठक घेतात. मात्र, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर आणि आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनामुळे मंत्री बैठकीला उपस्थित राहणार नसल्याने बुधवारची मंत्रिमंडळ बैठक रद्द करण्यात आली आहे.

अजित पवारांच्या उपस्थितीत आज बैठक
दरम्यान, राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्यात आणखी कडक निर्बंध आणले जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भात आज, बुधवारी बैठक होईल. या बैठकीतील चर्चेची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली जाईल. त्यानंतर निर्बंधांबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी पुण्यात बोलताना दिली.

मुख्यमंत्री राज्याच्या जनतेच्या हिताच्या ज्या गोष्टी असतील, तर त्याला ताबडतोब होकार देतात. बुधवारच्या बैठकीमध्ये चर्चा करून कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत या मुख्यमंत्र्यांना सांगितल्या जातील. मुख्यमंत्र्यांच्या कानावर या गोष्टी घालून त्यांच्या होकारानंतरच तशा प्रकारच्या ऑर्डर बुधवारी राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये दिल्या जातील,’ अशी माहिती अजित पवारांनी दिली. राज्यात मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, नाशिक या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत.

राज्यात ७५ ओमायक्रॉन रुग्ण
राज्यात मंगळवारी ७५ ओमायक्रोन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. हे सर्व रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने रिपोर्ट केले आहेत. यात मुंबई ४०, ठाणे मनपा ९, पुणे मनपा ८, पनवेल ५, नागपूर व कोल्हापूर प्रत्येकी ३, पिंपरी-चिंचवड २ व भिवंडी-निजामपूर मनपा, उल्हासनगर, सातारा, अमरावती व नवी मुंबई प्रत्येकी १ असे रुग्ण सापडले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ६५३ ओमायक्रॉन विषाणूबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी २५९ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -