घरमहाराष्ट्रविकास कामाच्या स्थगितीवरून विधानसभेत गदारोळ, कामकाज चारवेळा तहकूब; विरोधकांची घोषणाबाजी

विकास कामाच्या स्थगितीवरून विधानसभेत गदारोळ, कामकाज चारवेळा तहकूब; विरोधकांची घोषणाबाजी

Subscribe

अधिवेशनापूर्वी बैठक घेऊन निर्णय घेण्याचे सरकारचे आश्वासन

नागपूर : राज्यात सत्तांतर घडवून आणल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विरोधी पक्षातील आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामांना दिलेल्या स्थगितीवरून मंगळवारी विधानसभेत गदारोळ झाला. विकास कामांवरील स्थगिती उठवावी या मागणीसाठी विरोधी पक्षाने आक्रमक होत जोरदार घोषणाबाजी केली. या गोंधळात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारून कामकाज पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेचया आमदारांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत धाव घेत सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू केली. या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज चार वेळा तहकूब करावे लागले. या विकास कामावरील स्थगितीच्या प्रश्नावर हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वी बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यानंतर विरोधक शांत झाले.

आमचे सरकार सर्वांना सोबत घेऊन चालणारे सरकार आहे. त्यामुळे अधिवेशन संपण्यापूर्वी विरोधी पक्षनेते आणि सर्व गटनेत्यांच्या बैठक घेऊन विकास कामावरील स्थगितीबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांच्या या आश्वासनंतर विरोधक शांत झाले आणि सभागृहाचे कामकाज पुढे सरकले.

- Advertisement -

आज विधानसभेत कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विरोधी बाकांवरील आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामांना सरकारने दिलेल्या स्थगितीचा मुद्दा उपस्थित केला. राज्य सरकारने अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या आणि बहुमताने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पातील विकास कामांना सरकारने स्थगिती दिली आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांना अनेकदा भेटूनही निर्णय झालेला नाही. राज्यात सरकार येत असते आणि जात असते. मात्र, कोणत्याही सरकारने मंजूर केलेली कामे कधी थांबवली नव्हती. ही विकास कामे महाराष्ट्रातील आहेत ती काही गुजरात,कर्नाटक किंवा तेलंगणाची नाहीत, असे पवार यांनी सरकारला सुनावले.

त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या वतीने खुलासा करताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर आमची कामे रोखण्यात आली होती, असा आरोप केला. गेली गेल्या अडीच वर्षात तुमच्या सरकारने भाजपच्या लोकांना एक नवा पैसा दिला नाही. तथापि आम्ही बदल्याची भावना ठेवणारे लोक नाही. आमच्या सरकारने ७० टक्के कामावरील स्थगिती उठवली आहे. उर्वरित ३० टक्के कामे अशी आहेत मी ज्यात तरतुदीचा नियम पाळला गेला नाही. सरकारच्या शेवटच्या काळात जिथे २ हजार कोटी रुपयांची तरतूद आहे, तेथे ६ हजार कोटी रुपयांचे कार्यारंभ आदेश देण्यात आले. ‘आमदनी अठन्नी आणि खर्चा रुपया’ अशी स्थिती असून हे पैसे आणायची कुठून?असा सवाल करत फडणवीस यांनी विरोधकांना निरुत्तर करण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

फडणवीस यांच्या या उत्तराने विरोधी बाकावरील आमदार संतप्त झाले. त्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या समोरील मोकळ्या जागेत येऊन जोरजोरात घोषणा द्यायला सुरुवात केली. सरकारविरोधी घोषणा देण्यात माजी मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे आघाडीवर होते. वारंवार सूचना करूनही विरोधी पक्षातील आमदारांची घोषणाबाजी थांबत नसल्याचे पाहून राहुल नार्वेकर यांनी प्रश्नोत्तरे पुकारून कामकाज पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गोंधळ आणखी वाढल्याने सलग चार वेळा सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले.

यादरम्यान विधानसभा अध्यक्षांच्या दालनात बैठक होऊन या प्रश्नावर तोडगा निघाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले सरकार हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वी विरोधी पक्षनेते आणि सर्व गट नेत्यांची बैठक घेऊन विकास कामावरील स्थगिती उठविण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर विरोधक शांत झाले.

विरोधकांची घोषणाबाजी

स्थगिती सरकार हाय हाय….

५० खोके, सरकार ओके….

खोके सरकार हाय हाय

नही चलेगी…नही चलेगी…दादागिरी नही चलेगी


काही गोष्टी तुमच्याकडूनच शिकलो, फडणवीसांचा अजितदादांना टोला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -