घरमहाराष्ट्रअतिपावसामुळे माळशेजसह 'या' पर्यटनस्थळांवर पर्यटकांना बंदी!

अतिपावसामुळे माळशेजसह ‘या’ पर्यटनस्थळांवर पर्यटकांना बंदी!

Subscribe

मुरबाड तालुक्यातल्या माळशेज घाटासोबतच ठाणे जिल्ह्यातल्या अनेक पर्यटन स्थळांवर अतिपावसामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यटकांना मज्जाव करण्याचे आदेश काढले आहेत.

गेल्या आठवड्याभरापासून मुंबई आणि उपनगरांसह ठाणे जिल्ह्यातही पावसानं दमदार हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी कोसळलेल्या धोधो पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं देखील चित्र आहे. काही ठिकाणी अशा पावसामुळे धोकादायक बनलेल्या परिस्थितीमध्ये जीवितहानी झाल्याच्या देखील काही घटना समोर आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी ठाणे, कल्याण, मुरबाड, भिवंडी, शहापूर आणि अंबरनाथ या सहा तालुक्यांमधील धबधबे, तलाव, खाडी परिसरात असणारी पर्यटन स्थळे येत्या ३१ जुलैपर्यंत पर्यटनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पावसाला सुरुवात झाल्यानंतर पर्यटनासाठी या स्पॉटवर जाण्याचे प्लॅन्स बनवणाऱ्या पर्यटकांचा काही प्रमाणात हिरमोड झाला आहे. मात्र, पर्यटकांच्या सुरक्षेसाठीच हा निर्णय घ्यावा लागल्याचं जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जारी केलेल्या आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे.

कोणत्या ठिकाणी घातली बंदी?

१) ठाणे तालुका – येऊर येथील धबधबे, सर्व तलाव, कळवा-मुंब्रा-रेतीबंदर, मुंब्रा बायपासमधील धबधबे, घोडबंदर-रेतीबंदर-उत्तन सागरी किनारा

- Advertisement -

२) कल्याण तालुका – पायशेपाडा, खडवली नदी परिसर, टिटवाळा नदी परिसर, गणेश पाटे चौपाटी

३) मुरबाड तालुका – माळशेज घाटातील सर्व धबधबे, सिद्धगड, डोंगरन्हावे, सोनावळे लेण्या, पडाळे डॅम, खोपवली, गोरखगड, नाणेघाट, धसई डॅम, आंबेटेंबे

- Advertisement -

४) भिवंडी तालुका – नदीनाका, गणेशपुरी नदी परिसर

५) शहापूर तालुका – भातसा जलाशय, कुंडन, माहुली गडावरील धबधबे, अशोक धबधबा, खरोड, सापगाव नदी किनारा, कळंबे नदी किनारा

६) अंबरनाथ तालुका – कोंडेश्वर, धामणवाडी, तारवाडी, भोज, वऱ्हाड, दहीवली, मळीधोवाडी

माळशेजसाठी कोट्यवधींचा खर्च; मात्र सुरक्षेच काय?

पर्यटन विकासाच्या नावाखाली माळशेज घाटात कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. अगदी सुसज्ज पार्किंग व्यवस्था, संरक्षक कठडे, चकाचक रस्ता, घाटमाथ्यावर पर्यटन विकास महामंडळाचे गेस्ट हाउस, इ. सोई पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी करण्यात आल्या आहेत. मात्र, दरवर्षी कोसळणाऱ्या दरडींच्या सावटाखाली जीव धोक्यात घालून पर्यटकांना माळशेजची असुरक्षित पर्यटन सहल करावी लागते आहे.

संरक्षक जाळी लावणे अशक्य!

माळशेज घाटात ज्या ठिकाणी दरड कोसळतात त्या ठिकाणी एकावर एक असे तीन डोंगर आहेत. त्यामुळे खाली जरी जाळी लावली तरी वरच्या भागावरून दरडी कोसळत असतात. या धोकादायक भागाची उंची ३०० ते ३५० मीटर असल्यामुळे जाळी लावणे शक्य नाही. त्यासाठी तज्ञांची मदत घेऊन ठोस उपाय योजना करणे गरजेचे आहेत.

भौगोलिक रचना आणि माळशेज!

सह्याद्री पर्वताचा दगड हा  काळा कातळ (बेसोल्ट) या प्रकारचा आहे. याशिवाय सह्याद्रीची निर्मिती ही एकावर एक दगड आणि मातीचे थर अशी आहे. त्याचबरोबर पर्वतावर मोठमोठे वृक्ष आहेत. त्यांची मुळे खोलवर गेल्याने डोंगरातील दगडांना तडे जातात. पावसाळ्यात मातीच्या थरांमध्ये पाणी गेल्यावर ही माती चिकट होते. परिणामी दगडाचा वरचा थर कोसळतो. माळशेज घाट रस्ता हा अनेक डोंगरकड्यांच्या पायथ्यावर बांधण्यात आला आहे. त्यामुळे पर्वत माथ्यावरील कडे, दरडी थेट माळशेज घाटात कोसळतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -