घरमहाराष्ट्रसहगल वाद भाग २ : श्रीपाद जोशींचा राजीनामा

सहगल वाद भाग २ : श्रीपाद जोशींचा राजीनामा

Subscribe

नयनतारा सहगल यांना पाठवलेलं निमंत्रण रद्द करण्यापासून सुरू झालेलं साहित्य संमेलनाचं वादनाट्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांच्या राजीनाम्यापर्यंत येऊन पोहोचलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या नयनतारा सहगल निमंत्रण रद्द प्रकरणाचा दुसरा भाग बुधवारी सुरू झाला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलानाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी सहगल प्रकरणामुळे सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता नवं वळण लागलं आहे. नयनतारा सहगल यांना पाठवलेलं निमंत्रण रद्द करण्याचा निर्णय नक्की कुणाचा? आयोजकांवर कुणाचा दबाव होता? राज्य सरकारची या सगळ्या प्रकणामध्ये काही भूमिका होती का? अशा मुद्द्यांभोवती या प्रकरणावरून सध्या मोठा वाद सुरू आहे.

निमंत्रण रद्द करण्याचं कारण काय?

यवतमाळमध्ये होणाऱ्या ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्धाटन समारोहाचं निमंत्रण ज्येष्ठ साहित्यिका आणि लेखिका नयनतारा सहगल यांना पाठवण्यात आलं होतं. मात्र, यवतमाळमधील मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्याने ‘मराठी साहित्य संमेलनाला हिंदी लेखिका का?’ असा आक्षेप घेत वाद निर्माण केला. त्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचं कारण देत रविवारी अर्थात ६ जानेवारीला आयोजकांकडून नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द करण्यात आलं.

- Advertisement -

तुम्ही हे वाचलं का? – नयनतारा सहगल प्रकरण : साहित्यिकांचा निमंत्रण वापसीचा सूर

राज ठाकरेंची दिलगिरी

दरम्यान, सोमवारी अर्थात ७ जानेवारी रोजी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी सहगल यांच्या उपस्थितीला मनसेचा आक्षेप नाही असं स्पष्ट केलं. मात्र, तरी देखील निंमत्रण आधीच रद्द झाल्यामुळे साहित्य विश्वामध्ये वाद सुरू झाला. अनेक साहित्यिकांनी आयोजकांच्या या निर्णयाची निर्भर्त्सना केली. मात्र त्याहून वर म्हणजे निमंत्रण रद्द करण्याच्या या नाट्याच्या मागे कोण आहे? यावर वेगवेगळे तर्कवितर्क लढवून वाद सुरू झाला. काहींनी यासाठी महामंडळाला दोषी धरलं, तर अनेकांनी थेट राज्य सरकारच्या दबावाचा संशय व्यक्त केला.

मुख्यमंत्र्यांनी दिलं स्पष्टीकरण

राज्य सरकारवर करण्यात आलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं. ‘राज्य सरकारचा यामध्ये काहीही संबंध नसून हा सर्वस्वी आयोजकांच्या अखत्यारीतला विषय असून राज्य सरकारला यामध्ये गोवू नका’, असा खुलासा मुख्यमंत्र्यांनी दिला.

- Advertisement -

विद्या देवधरांकडे जाणार सूत्र?

या सगळ्या पार्श्वभूमीवर साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी दिलेला राजीनामा नव्या चर्चांना सुरुवात करून देणारा आहे. विदर्भ साहित्य संघाच्या ई-मेलवर श्रीपाद जोशींनी आपला राजीनामा पाठवला आहे. त्यामुळे आता अध्यक्षपदी कोण येणार? याची चर्चा सुरू झाली आहे. उपाध्यक्ष विद्या देवधर यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्र सोपवली जाण्याची शक्यता अंतर्गत सूत्रांनी वर्तवली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -