घरमहाराष्ट्रदूध आंदोलन पेटले, मुंबई लक्ष्य!

दूध आंदोलन पेटले, मुंबई लक्ष्य!

Subscribe

प्रत्येक लिटर मागे पाच रुपये अनुदान थेट दूध उत्पादकाच्या खात्यात जमा करा, अशी आग्रही मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविवारी मध्यरात्रीपासून राज्यभर दूध आंदोलन सुरू केले आहे.

प्रत्येक लिटर मागे पाच रुपये अनुदान थेट दूध उत्पादकाच्या खात्यात जमा करा, अशी आग्रही मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविवारी मध्यरात्रीपासून राज्यभर दूध आंदोलन सुरू केले आहे. खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन पेटले असून राज्यातील विविध भागात संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या आंदोलनाची तीव्रता अधिक करण्यासाठी आंदोलनकर्ते मुंबईचा दूध पुरवठा ठप्प करण्याकडे विशेष लक्ष केंद्रित करणार आहेत.

सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे तसेच अमरावती येथे कार्यकर्त्यांनी दुधाचे टँकर फोडून दूध रस्त्यावर सांडले. तर काही ठिकाणी दुधाच्या पिशव्या रस्त्यावर फेकून दिल्या. या आंदोलनाची तीव्रता अधिक निर्माण व्हावी, याकरता मुंबईला दुधाचा पुरवठा तोडण्याचा आंदोलनकर्त्यांचा प्रयत्न सुरू आहे. तर दुसरीकडे हे आंदोलन मोडून काढण्यासाठी सरकारही प्रयत्न करत असून रविवारी अनेक कार्यकर्त्यांची धरपकड करून त्यांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले. यावर खासदार शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली.

- Advertisement -

दूध संकलन बंद

मुंबईचा दूध पुरवठा खंडित करण्याचा निर्णय आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे. गुजरातमधून मुंबईत येणार्‍या दूधाचा टँकर सौराष्ट्र मेलला सोमवारी जोडण्यात आला नव्हता. नाशिकहून मुंबईत येणारे दुधाचे टँकर मात्र पोलीस संरक्षणात आले. त्यामुळे मुंबईतील दूध पुरवठ्यावर तितका परिणाम झाला नाही, पुण्यातही चितळे दुधाचे वितरण व्यवस्थित पार पडले. मात्र कोल्हापुरातील गोकुळ तर सोलापुरातील दूधपंढरीचे दूध संकलन बंद होते. त्यामुळे मंगळवारी या आंदोलनाचा परिणाम दिसण्याची शक्यता आहे.

विरोधकांचे घंटा आंदोलन

दूध उत्पादक शेतकर्‍यांना पाच रुपये प्रतिलिटर दरवाढ मिळावी, यासाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी विधानभवन परिसरात केली. विधान भवनाच्या पायर्‍यांंवर उभे राहून विरोधकांनी घंटानाद करत सरकारच्या धोरणांचा निषेध केला. सरकारला शेतक-यांशी काही घेणेदेणे नाही म्हणून आम्ही गायीच्या गळ्यातील घंटा हे प्रतीक म्हणून घंटानाद आंदोलन करत आहोत, असे अजित पवार म्हणाले. तर हे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केल्यास सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील, असे विखे-पाटील म्हणाले.

- Advertisement -

सरकारने पाच रुपये अनुदानाची घोषणा विधिमंडळात करावी, त्यानंतरच आम्ही दूध आंदोलन मागे घेऊ, हे आंदोलन मोडण्याचा प्रयत्न झाल्यास आंदोलन तीव्र करू.
– खा. राजू शेट्टी

हे आंदोलन शेतकर्‍यांसाठी नसून निवडणुकांसाठी आहे आणि रस्त्यावर ओतल्या जाणार्‍या दुधात किती पाणी असते हे मला चांगले माहीत आहे. –  सदाभाऊ खोत, कृषी राज्यमंत्री 

मुंबईतील दुधाची मागणी

मुंबईची दुधाची गरज भागवण्यासाठी अमूल डेअरीचे १२ ते १२.५० लिटर दूध, गोकूळ ७ ते ७.५० लाख लिटर, मदर डेअरी २ लाख लिटर, वारणा २ लाख लिटर, नंदीनी दूध १ लाख लिटर, गोवर्धन २.५० लाख लिटर,गोविंद १ लाख लिटर, प्रभात १ लाख लिटर, कृष्णाई ८० ते ९० हजार लिटर आणि सोनाईचे ५० हजार लिटर दूध मुंबईमध्ये येते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -