मशीद, मुस्लिम अशा गोष्टी आव्हाडांनी ऐकल्यावर त्यांच्या अंगात…, मनसेकडून जितेंद्र आव्हाडांवर पलटवार

MNS avinash jadhav retaliates against Jitendra awhad reaction about raj thackeray speech
मशीद, मुस्लिम अशा गोष्टी आव्हाडांनी ऐकल्यावर त्यांच्या अंगात..., मनसेकडून जितेंद्र आव्हाडांवर पलटवार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील मशिदींवर असलेल्या भोंग्यांविरोधात हानुमान चालीसा लावणार असल्याचा इशारा दिला आहे. तसेच राज्यातील आणि मुंब्र्यातील मदरशांवर केंद्र सरकारने धाडी टाकल्या पाहिजेत अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंवर टीका केली होती. कारण नसताना मुंब्राचे नाव घेऊन जातीयवादी विधान राज ठाकरेंनी केलं आहे. त्यांनी माझ्यासोबत मुंब्र्यातील मदरशांमध्ये यावे, एक दाढीचा वस्तरा सापडला तर मी राजकारण सोडेन असे थेट आव्हान जितेंद्र आव्हाडांनी राज ठाकरेंना दिले होते. जितेंद्र आव्हाडांच्या टीकेला मनसेकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. मशीद आणि मुस्लिमांबाबत बोललं की जितेंद्र आव्हाडांना पुळका येतो अशी टीका मनसेकडून करण्यात आली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या टीकेला मनसे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मशीद, भोंगा आणि मुस्लिम अशा गोष्टी जितेंद्र आव्हाडांना ऐकायल्या आल्या की त्यांच्या अंगामध्ये देव संचारतो मग ते भडभड बोलायला लागतात असा टोला अविनाश जाधव यांनी केली आहे.

राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी तीन वेळा माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. त्यांना माहिती आहे की, राज ठाकरेंवर बोलल्यावर आपल्याला प्रसिद्धी मिळते. यामुळे मुंब्रातील लोकं त्यांची वाह वाह करतात म्हणून ते बोलत असतात. परंतु तीनवेळा बोलण्याची काय गरज होती. एकदा बोललं तरी तेच दिवसभर चालते अशा शब्दात अविनाश जाधव यांनी जितेंद्र आव्हाडांवर पलटवार केला आहे.

आव्हाडांना भोंग्याबद्दल पुळका

दरम्यान अविनाश जाधव पुढे म्हणाले की, जितेंद्र आव्हाडांना १९९९ नंतरचा इतिहास कदाचित माहिती नसेल त्यांना मी सांगतो, ठाण्यात मोठ्या दोन दंगली झाल्या होत्या. २००७-८ साली ठाण्यातील राबोडीमध्ये आणि भिवंडीमध्ये मोठी दंगल झाली. या दंगलीत २ पोलिसांनी आपले प्राण गमावले होते. या पोलिसांच्या कुटुंबियांना काय वाटलं असेल? याचा जितेंद्र आव्हाड यांना पुळका आला नाही. परंतु मशीद, भोंग्याबद्दल बोललं की आव्हाडांना पुळका येतो असा हल्लाबोल अविनाश जाधव यांनी जितेंद्र आव्हाडांवर केला आहे.

मतदार नाराज होऊ नये यासाठी तळमळ

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नमाज पठण करु नये असे म्हटलं नाही, तुमची श्रद्धा असली तरी ती चार भींतीमध्ये चालते. राज ठाकरेंनी पहिल्यांदाच भोंग्याविरोधातील भूमिका घेतली नाही. यापूर्वीसुद्धा अनेकवेळा त्यांनी वक्तव्य केलं आहे. तेव्हा राज ठाकरेंची भूमिका चांगली वाटली होती. परंतु आता मुंब्रामधील मतदार नाराज होऊ नये यासाठी जितेंद्र आव्हाडांची तळमळ होत असल्याचे अविनाश जाधव म्हणाले आहेत.


हेही वाचा : Deva Gurjar Murder : कोटामधील गुंड देवा गुर्जरची दिवसाढवळ्या हत्या, लोखंडी पाईपने हल्ला