घरमहाराष्ट्रदुष्काळग्रस्त मोखाड्यात ऐन उन्हाळ्यात ‘भुईमूग' क्रांती

दुष्काळग्रस्त मोखाड्यात ऐन उन्हाळ्यात ‘भुईमूग’ क्रांती

Subscribe

योग्य मार्गदर्शन, सामूहिक प्रयत्न आणि चिकाटी असेल, तर ‘प्रयत्ने वाळुचे कण रगडिता तेलही गळे' ही म्हण प्रत्यक्षात येऊ शकते. हे तुळ्याचा पाडा या गावातील आदिवासी शेतकऱ्यांनी करुन दाखवले.

मे महिन्यात पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुका म्हटले की, भीषण पाणी टंचाई आणि हंडाभर पाण्यासाठी महिलांना करावी लागणारी कैक किलोमिटरची पायपीट असे चित्र डोळ्यासमोर येते. मात्र योग्य मार्गदर्शन, सामूहिक प्रयत्न आणि चिकाटी असेल, तर ‘प्रयत्ने वाळुचे कण रगडिता तेलही गळे’ ही म्हण प्रत्यक्षात येऊ शकते. हे याच तालुक्यातील मोहाडा ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या तुळ्याचा पाडा या गावातील आदिवासी शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे. यंदा प्रथमच गावातील १०८ शेतकऱ्यांनी गटाने ५४ एकर जागेत भुईमुगाची लागवड केली. गावाशेजारीच असलेल्या छोट्या धरणातून सौरपंपाने या पिकाला नियमितपणे पाणी देण्यात आले. त्यांच्या या सामूहिक शेतीला यश आले असून १५ मे पासून भुईमूगाची काढणी सुरू होणार आहे.

- Advertisement -

शेतकऱ्यांच्या मेहनतीला फळ

यापूर्वी मोखाड्यातील काही शेतकरी भुईमूगाची लागवड करीत होते. मात्र त्यातून त्यांना फारसे उत्पन्न मिळत नव्हते. गटशेतीच्या प्रयोगाने मात्र शेतकऱ्यांना चांगलाच लाभ होणार आहे. यंदा साधारण एकरी १४ क्विंटल म्हणजेच एकूण ७५६ क्विंटल भुईमूगाचे पीक शेतकऱ्यांच्या हाती लागेल, असा विश्वाास या प्रकल्पाला मार्गदर्शन करणाऱ्या प्रगती प्रतिष्ठान या संस्थेच्या सुनंदा पटवर्धन यांनी व्यक्त केला आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील बहुतेक शेतजमीन पावसाळ्यात भातपीक घेतले की मोकळीच राहते. पाण्याचा अभाव, शेतमालाला पुरेसा भाव न मिळणे, उदासिनता या कारणांमुळे शेतकरी अधिक आर्थिक उत्पन्न मिळवू शकत नाहीत. मात्र त्यांना योग्य मार्गदर्शन आणि तंत्रज्ञानाची मदत देऊ केली तर निश्चितच जमिनीतून सोने पिकू शकते, हे तुळ्याचा पाड्यातील ग्रामस्थांनी दाखवून दिले आहे.

सर्वांच्या सहकार्यातून सोनं पिकलं

तुळ्याचा पाडा गावालगत एक छोटे धरण आहे. मात्र वीज नसल्याने ते पाणी उचलून शेतीला वापरता येत नव्हते. त्यामुळे पाणी असूनही जमीन कोरडी अशी परिस्थिती होती. या परिसरात काम करणाऱ्या प्रगती प्रतिष्ठान या संस्थेने बँक ऑफ अमेरिका मुंबई शाखेच्या सहकार्याने शेतकऱ्यांना धरणातून पाणी उचलण्यासाठी सौरपंप दिले. प्रत्येकी दहा शेतकऱ्यांचे गट करण्यात आले. त्यांनी आपापल्या शेतात अर्धा एकर जागेत जानेवारी महिन्यात भुईमुगाची लागवड केली. प्रत्येक शेतकऱ्याला आठवड्यातून तीनवेळा प्रत्येकी सहा तासांसाठी ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देण्यात आले. दहा जणांच्या गटाने एकमेकांना मदत केली. ‘एकमेका सहाय्य करून अवघे धरू सुपंथ’ या म्हणीनुसार त्यांनी उत्तम भुईमूगाचे पीक पिकवले.

‘एरवी एकट्याने इतक्यात जागेत भुईमूग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या हाती जेमतेम २० हजार रूपये येत होते. गट शेतीमुळे यंदा त्यांच्या हाती किमान ३० हजार रूपये पडणार आहेत. प्रत्येक गटाकडून प्रगती प्रतिष्ठान शंभर किलो शेंगदाणे घेऊन त्याचे तेल काढणार आहे. भुईमूगाप्रमाणेच सूर्यफूल आणि करडई या तेलबियांचीही लागवड करण्याची योजना आहे. त्यानंतर लाकडी घाण्याने तेल काढण्याचा प्रकल्प इथे सुरू केला जाईल. अशाप्रकारे शेतीवर आधारित उद्योगामुळे स्थानिक सुशिक्षित तरुणांना रोजगार मिळेल.’ – सुनंदा पटवर्धन, प्रगती प्रतिष्ठान.

‘गेली कित्येक वर्षे तुळ्याचा पाड्यातील धरणातील पाणी वापरले जात नव्हते. सौरपंपामुळे ते शक्य झाले. शासनाने वीज उपलब्ध करून दिली तर या धरणातून पंचक्रोशीतील सर्व शेतकऱ्यांना उन्हाळी शेतीसाठी पाणी मिळू शकेल. त्यातून त्यांचे उत्पन्न वाढेल.’ – जयराम भस्मे, गटशेती प्रकल्प समन्वयक, तुळ्याचा पाडा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -