ठाण्यात उल्हासनगरची पुनरावृत्ती; स्लॅब कोसळल्याने दोन मुलांसह आई जखमी

ठाणे शहरातील नौपाडा, भास्कर कॉलनी येथील अमर टॉवर या 25 वर्ष जुन्या असलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत आईसह दोन मुले जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे.

Mother with two children injured due to slab collapse in Thane

ठाणे : शहरातील नौपाडा, भास्कर कॉलनी येथील अमर टॉवर या 25 वर्ष जुन्या असलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील स्लॅब कोसळून प्रथमेश सूर्यवंशी (28) त्याची आई विजया (54) आणि भाऊ अथर्व (14) असे तिघे मायलेक जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. (Mother with two children injured due to slab collapse in Thane) तर वरच्या मजल्यावर अडकलेल्या शिशिर पित्रे (60) यांना रेस्क्यू करून सुखरूप बाहेर काढण्यात आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. तर सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण इमारत रिकामी करण्याची कार्यवाही करण्यात आलेली आहे. तसेच जखमींना खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान ही घटना उल्हासनगरमधील घटनेची पुनरावृत्ती असल्याचे म्हटले जात आहे.

हेही वाचा – पंजाबमध्ये महिलेची हत्या; गुरुद्वारा परिसरात दारू पीत असल्यामुळे भाविकाने झाडल्या गोळ्या

नौपाड्यात अमर टॉवर इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील स्लॅब कोसळून पाच जण अडकले आहेत. अशी माहिती मिळताच, घटनास्थळी नौपाडा पोलीस, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, मुख्य अग्निशमन अधिकारी व आपत्ती व्यवस्थापन कक्ष, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे (TDRF) जवान तसेच अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी तातडीने अडकलेल्या पाच जणांना बाहेर काढण्याचे ऑपरेशन सुरू केले. यावेळी रूम 101 चा स्लॅब पडला त्या घरात चौघे आणि त्याच्यावरील मजल्यावरील एक असे पाच जण अडकले होते. यामध्ये प्रथेमश, अर्थव यांच्यासह आई जखमी झाली असून त्यांची बहीण प्रियांका (24) हिला कोणतीही दुखापत झालेली नसल्याची माहिती समोर आली आहे. तर 201 रुममध्ये अडकलेल्या शिशिर (60) या वृद्धाला सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे.

तसेच रूम नं. 101 चा स्लॅब कोसळल्याने तळमजल्यावरील रूम नं. 01 या राजा जोशी यांच्या मालकी असलेल्या रूमच्या स्लॅबलाही काही प्रमाणात तडे गेले आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली आहे. या इमारतीत एकूण 33 सदनिका आहेत. तसेच या इमारतीला महापालिकेने धोकादायक म्हणून जाहीर केले नसल्याची माहिती समोर आलेली आहे. तर सोसायटी दर तीन वर्षांनी स्ट्रक्चर ऑडिट करून घेत असल्याचे रहिवाशांकडून सांगण्यात आले आहे.

ज्यावेळी स्लॅब पडला त्यावेळी जखमी असलेला प्रथमेश हा किचनमधून बाहेर येत असताना, त्या स्लॅबची लोखंडी सळई त्याच्या डोक्याला लागल्याने तो रक्तबंबाळ झाला असून त्याच्या हाताला खरचटले आहे. तर त्याची आई आणि भावाला ही किरकोळ दुखापत झाली आहे. त्याची बहीण दुसऱ्या रूम मध्ये असल्याने तिला कोणतीही दुखापत झालेली नसल्याची माहिती देण्यात आली आहे. तर शिशिर पित्रे यांच्या हॉलची फ्लोरिंग पडल्याने त्यांना दुसऱ्या रूम मधून बाहेर येता येत नसल्याने ते अडकून पडले होते, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आली आहे.

ऑक्टोबरला ही असाच प्रकार कळव्यात देखील घडला होता. त्यावेळी त्या घटनेत तिघे जखमी झाले होते. कळव्यातील विक्रांत सोसायटीच्या पहिल्या मजल्यावरील स्लॅब 31 ऑक्टोबर 2022 रोजी पडला होता. त्यावेळी तिघे जखमी झाले होते. ती घटनाही सोमवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली होती. मात्र ती इमारत 38 वर्षे जुनी असल्याने त्या इमारतीच्या तळ मजल्यावर दुकाने होती. त्यावेळी जखमींच्या हाताला, डोळ्याला, पाठीला आणि डोक्याला दुखापत झाली होती.