घरमहाराष्ट्रMPSC परीक्षा पुढे ढकलल्या, कोण काय म्हणाले जाणून घ्या

MPSC परीक्षा पुढे ढकलल्या, कोण काय म्हणाले जाणून घ्या

Subscribe

राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे.

राज्यात कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० पुढे ढकलली आहे. यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यातील लाखो विद्यार्थ्यांनी याविरोधात आंदोलन केले आहे. पुणे,रायगड,औरंगाबाद, कोल्हापूरामधील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरुन राज्य सरकारविरोधात आंदोलन केले आहे. या आंदोलनाला भाजप आंमदारांकडून पाठींबाही देण्यात आला आहे. तर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. तर ठाकरे सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे म्हटले आहे.

परीक्षा पुढे ढकलल्याचे कारण समजत नाही – संभाजीराजे

राज्यात कोरोना वाढल्याचे कारण देत एमपीएससीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. परंतु कोरोना असतानाही आरोग्या विभागाच्या परीक्षा झाल्या आहेत. परंतु आथा लोकसेवा आयोगाने एमपीएससीच्या परीक्षा का रद्द करण्यात आल्या यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. असे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

सरकारने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू नये – दरेकर

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी एमपीएससी परीक्षांबाबत सरकारचे नियोजन चुकले असल्याचे म्हटले आहे. सरकारकडून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा प्रयत्न होत आहे. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यामध्ये लक्ष घालून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा असे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

सरकारने तातडीने फेरविचार करावा – सत्यजीत तांबे

एमपीएससीची परीक्षा अचानकपणे पुढे ढकलण्याचा जो निर्णय आज झाला आहे, त्याचा मी जाहीर निषेध करतो. करोनाचे संकट कितीही मोठे असले तरीही अशा पध्दतीने अचानकपणे परीक्षा पुढे ढकलून काय साध्य होणार आहे ? ह्या निर्णयावर तातडीने फेरविचार झालाच पाहीजे. असे ट्विट काँग्रेस युवा नेते सत्यजीत तांबे यांनी केले आहे.

- Advertisement -

ठाकरे सरकार गोंधळलेले – पडळकर

राज्यात एमपीएससीच्या परीक्षा ग्रामीण भागातील विद्यार्थीही मोठ्या प्रमाणात देतात. १४ मार्चला होणाऱ्या एमपीएससीच्या परीक्षा या झाल्या पाहीजेत यामध्ये राजकारण करु नका, राज्य सरकार हे गोंधळलेलेल असल्याचा आरोपही भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारवर केला आहे.

परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय चुकीचा – पंकजा मुंडे

लोकसेवा आयोगाने राज्य सेवा पूर्व परीक्षा ढकलण्याचा निर्णय चुकीचा आहे. या परीक्षेसाठी ग्रामीण भागातीव विद्यार्थी मोठ्या प्रमाणात येतात त्यामुळे परीक्षा पुढे ढकल्यास विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. खेड्या पाड्यातील विद्यार्थी या परीक्षेसाठी शहरात येतात त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय चुकीचा आहे. असे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यावे – रोहित पवार

यापुढं कोरोनामुळं कोणतीही गोष्ट न थांबवता कोरोना प्रतिबंधक नियम पाळून आपल्याला पुढं जावं लागेल. त्यासाठी लोकही सहकार्य करतील असा विश्वास आहे. त्यानुसारच #MPSC ची परीक्षाही झाली पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आपण याकडं लक्ष द्यावं, अशी विनंती आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

लवकर परीक्षा व्हावी ही सरकारची भूमिका – वडेट्टीवार

राज्य सरकारने MPSC परीक्षेबाबत आज घेतलेल्या निर्णयाला पुन्हा वेगाने वाढत असलेले कोरोना संकट कारणीभूत आहे. राज्यातील भाजप नेत्यांनी या संकटात तेल घालून विद्यार्थ्यांमध्ये गैरसमज पसरवू नये. एक वेळ उपाशी पोटी राहून,घाम गाळून मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणाऱ्या आई वडिलांचा विचार करून लवकर परीक्षा व्हावी ही सरकारची भूमिका आहे. विरोधी पक्षाने सामंजस्याची भूमिका घेऊन या संकटावर तोडगा काढण्यासाठी सरकारसोबत चर्चा करावी,आणि संकटात स्वतःचा फायदा संधी शोधणे थांबवावे. असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

राज्य सरकारने निर्णय मागे घ्यावा – अमित ठाकरे

माझी राज्य सरकारकडे आग्रहाची मागणी आहे की, विद्यार्थ्यांच्या भावनांचा आदर ठेवून आपला निर्णय मागे घ्यावा व परीक्षा ठरलेल्या दिवशी म्हणजे १४ मार्च रोजीच घ्यावी. या परीक्षेला केवळ तीन दिवस उरलेले असताना ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे प्रशासकीय सेवेत जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे भावविश्व उद्ध्वस्त झाले आहे. एमपीएससी परीक्षेसाठी वर्षानुवर्षे तयारी करणारे लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनी या निर्णयामुळे संतप्त झाले असून पुणे, संभाजीनगर तसंच राज्यात ठिकठिकाणी रस्त्यावर उतरत आहेत. उद्या या विद्यार्थ्यांचा असंतोष तीव्र आंदोलनाच्या रूपाने बाहेर पडला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? असे वक्तव्य मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी केले आहे.

परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय रद्द करावा – फडणवीस

एमपीएससीच्या परीक्षा सातत्याने पुढे ढकलण्यामुळे वर्षानुवर्षे त्यासाठी तयारी करणार्‍या असंख्य विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि मानसिक खच्चीकरण होते आहे. त्यामुळे परीक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय तत्काळ रद्द करावा असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

एमपीएससीची परीक्षा झाली पाहिजे – नाना पटोले

अनेक संकटांना मात करत विद्यार्थी हा परिक्षा करीता परिश्रम घेत असतो. जवळ आलेली #MPSC ची परीक्षा झाली पाहिजे कारण विद्यार्थांचा भविष्य हे परीक्षा वर अवलंबून असतो. कोरोना चे संपूर्ण नियमांचे पालन करत विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याकरीता परीक्षा झाली पाहिजे ही आमची रास्त मागणी आहे.

परीक्षा पुढे ढकलण्याने विद्यार्थ्यांवर अन्याय – चंद्रकांत पाटील

mpsc परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. सरकारमध्ये गोंधळाची परिस्थिती उद्भावली आहे. प्रत्येक विद्यार्थी या परीक्षेसाठी २ ते ३ वर्ष प्रयत्न करत असतो. या परीक्षेसाठी अनेक वर्षांची मेहनत विद्यार्थ्यांनी घेतलेली असते. त्यामुळे विद्यार्थी रस्त्यावर उतरणे स्वाभाविकच आहे. असे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

परीक्षांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार – बच्चू कडू

एमपीएससी मार्फत होणारी परीक्षा पुढे ढकलली आहे. या विरोधात विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. त्यांची मागणी ही रास्त आहे. मंत्री उदय सामंतजी सोबत या विषयावर माझे बोलणे झाले. लवकरच मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांची या विषयावर भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

दुटप्पी भूमिका घेणारं संभ्रमी सरकार – मुनगंटीवार

ठाकरे सरकार हे अतिशय दुटप्पी भूमिका घेणारं संभ्रमी सरकार आहे. विद्यार्थ्यांच्या मनात मेहनतीबाबत प्रश्नचिन्ह आहे. सरकार वयोमर्यादा वाढवण्याबाबत निर्णय घेत नाही. आरोग्य विभागात नोकरभरतीसाठी परीक्षा घेण्यात आली. मंत्र्यांनी कोरोना खालात सभा घेतल्या, मोर्चे काढले, पोहरादेवीवर हजारो लोक एकत्र येतात तिथं एफआयआर दाखल होत नाही. परंतु MPSC च्या परीक्षा घेताना कोरोनाचे कारण देत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलाय असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णयाचा निषेध – प्रकाश आंबेडकर

राज्य सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकल्याने ओबीसी, एससी, एसटी या विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. वंचित बहुजन आघाडी राज्य शासनाच्या या निर्णयाचा निषेध करीत असल्याचे म्हटले आहे.

मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील – वरुण सरदेसाई 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अतिशय संवेदनशील नेते आहेत. कोरोना काळात संपूर्ण राज्याला ज्या संवेदनशीलतेने मुख्यमंत्र्यांनी सांभाळले आहे त्याच प्रमाणे MPSC विद्यार्थ्यांच्या विषयी पण ते लवकरच हिताचा निर्णय घेतील. विद्यार्थ्यांच्या मागण्या योग्यच असून त्यांच्या समस्येचे कोणी राजकीय भांडवल करू नये असे युवासेनेचे वरुन सरदेसाई यांनी म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -