मोहित भारतीय मानहानी प्रकरण: नवाब मलिकांचा १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

Mumbai court grants bail to Nawab Malik in defamation case filed by BJP's Mohit Kamboj
मोहित भारतीय मानहानी प्रकरण: नवाब मलिकांचा १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

भाजप नेते मोहित कंबोज यांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात माझगाव न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला होता. याप्रकरणी आज माझगाव न्यायालयात सुनावणी पार पडली आणि नवाब मलिक यांचा १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर माझगाव न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. शिवाय मलिक यांना ५ हजार रुपये अनामत जमा करण्याचे आदेश देखील दिले आहेत. याप्रकरणाची पुढील सुनावणी ३० डिसेंबरला होणार आहे.

नवाब मलिक यांच्या विरोधात मोहित भारतीय यांनी मानहानीचा खटला दाखल करून १०० कोटींचा दावा केला होता. याप्रकरणी माझगाव न्यायालयाने गुन्हेगारी स्वरुपाच्या खटल्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे आज सोमवारी याप्रकरणाची सुनावणी माझगाव न्यायालयात पार पडली आणि आता याप्रकरणाची पुढील सुनावणी ३० डिसेंबरला होणार आहे.

दरम्यान ३ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू झालेल्या क्रूझ ड्रग्ज प्रकरणासंदर्भात नवाब मलिक सातत्याने अनेक खुलासे करताना दिसले. त्यादरम्यान मलिकांनी आर्यन खानला अटक नाही तर त्यांचे अपहरण करून खंडणी मागण्यात आली आणि या कटकारस्थानाचा मुख्य सुत्रधार मोहित भारतीय असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे याप्रकरणी मोहित भारतीय यांनी नवाब मलिकांविरोधात मानहानीचा खटला दाखल केला.

मोहित भारतीय कोण आहेत?

मोहित भारतीय भाजपचे सरचिटणीस आहेत. त्यांनी सोशल मीडियावर भाजप कार्यकर्ता असल्याचे म्हटले आहे. गेल्या काही वर्षांपासून मोहित भारतीय विविध पदांवर होते. २०१६ ते २०१९ यादरम्यान मोहित भारतीय यांनी भाजपचे मुंबई युवा शाखेच्या अध्यक्षपदावर होते. ऑगस्ट २०१९ पासून ते मुंबई भाजप सरचिटणीस आहेत. आर्थिक गैरव्यवहार केल्याचे आरोप त्यांच्या विरोधात आहे.


हेही वाचा – Winter Session : विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबरपर्यंत होणार – ॲड. अनिल परब