घरताज्या घडामोडीमुंबई पालिकेच्या स्थायी समितीत १९१ पैकी ५५ टक्के प्रस्ताव नामंजूर, उर्वरित निर्णय...

मुंबई पालिकेच्या स्थायी समितीत १९१ पैकी ५५ टक्के प्रस्ताव नामंजूर, उर्वरित निर्णय ७ मार्चला होण्याची शक्यता

Subscribe

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या आजच्या बैठकीत कोट्यवधी रुपयांचे १९१ प्रस्ताव मंजुरीसाठी आले होते. आजची बैठक शेवटची असल्याने सर्वच प्रस्ताव मंजूर होतील, अशी चर्चा पालिका वर्तुळात होती ; मात्र स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव व सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी भाजप व विरोधी पक्षाच्या सहमतीने ४५% प्रस्तावच मंजूर केले. त्यामुळे उर्वरित नामंजूर ५५% प्रस्तावांचा फैसला ७ मार्च रोजीच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे.

मुंबई महापालिकेची मुदत ७ मार्च रोजी संपुष्टात येणार आहे. त्यानंतर पालिका निवडणूक लागेल. अथवा पालिकेवर प्रशासक नेमला जाईल. तत्पूर्वी स्थायी समितीच्या बुधवारी पार पडलेल्या बैठकीत तब्बल १७९ प्रस्ताव व अगोदरच्या ११, १८ व २३ फेब्रुवारीच्या बैठकीतील प्रलंबित १२ विषय असे एकूण १९१ प्रस्ताव मंजुरीला आले होते. मात्र अध्यक्ष यशवंत जाधव यांनी, चालू बैठकीतील १७९ पैकी ९६ विषय तर अगोदरच्या बैठकीतील प्रलंबित ११ विषय असे जवळजवळ १०७ विषय हे नामंजूर केले. उर्वरीत ८४ प्रस्ताव हे ७ मार्च रोजी होऊ घातलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी येणार आहेत. त्यावेळी आगामी बैठकीत नव्याने काही प्रस्ताव मंजुरीसाठी दाखल होतील. त्यामुळे ती बैठक खऱ्या अर्थाने चांगलीच गाजेल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

महत्वाचे प्रस्ताव रखडले

नालेसफाई कामाचे १३० कोटींचे प्रस्ताव, पुलांच्या दुरुस्तीचे ४२ कोटींचे प्रस्ताव,वरळी किल्ल्याच्या देखभाल दुरुस्तीचा ६३ लाखांचा प्रस्ताव, रस्ते कामांचे १३० कोटींचे प्रस्ताव, पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी दोन वर्षांसाठी भाडे तत्वावर घेतलेल्या पंप यंत्रणासाठी खर्चलेल्या ८७ कोटींचा कार्योत्तर मंजुरीचे प्रस्ताव, शाळा स्वच्छता, देखभाल करण्याबाबतचे फेरफार रकमेसह ३७९ कोटींचे प्रस्ताव, देवनार डंपिंग येथे भिंत बांधण्यासाठी ५३ कोटींचा प्रस्ताव, कामगारांच्या वसाहतींचा आश्रय योजनेअंतर्गत कामासाठी सल्लागार नेमण्याबाबतच्या कामांचे ३२ कोटींचे प्रस्ताव, डांबरी रस्ते कामांचे ४३ कोटींचे प्रस्ताव, उद्याने, मैदाने, मोकळ्या जागा, वाहतूक बेटे आदींचे परिरक्षण कामांचा कालावधी वाढविण्याबाबतचे महत्वाचे प्रस्ताव, जोगेश्वरी येथील शिल्पग्राम कंत्राट काम याबाबतचे कोट्यवधी रुपयांचे प्रस्ताव मंजुरी न मिळाल्याने रखडले.

- Advertisement -

मंजूर प्रस्ताव

यावेळी, हँकॉक पुलाच्या कामांचा प्रस्ताव, मानखुर्द – घाटकोपर पुलाचा १९ कोटींचा प्रस्ताव, वरळी किल्ल्याच्या सुशोभीकरणाचा प्रस्ताव , ए वार्डातील काँक्रीट रस्ते कामांचा १५ कोटींचा प्रस्ताव आदी काही कोटींचे प्रस्ताव यावेळी काही बाबतीत चर्चा करून तर काही बाबतीत विनाचर्चा मंजूर करण्यात आले.

सर्वच प्रस्ताव महत्वाचे : यशवंत जाधव

तुम्ही आज ५०% प्रस्ताव मंजूर केले, तर नालेसफाई व अन्य महत्वाच्या कामांचे काही प्रस्ताव मंजूर न करता राखून का ठेवले, असे प्रश्न विचारले असता स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी, सर्वच प्रस्ताव महत्वाचे होते. काही प्रस्ताव एकमताने मंजूरही केले, असे त्यांनी सांगितले.


हेही वाचा : ICC T20 Rankings: टी-२० रँकिंगमध्ये श्रेयस अय्यरने गाठलं १८वं स्थान, विराटला मोठा धक्का


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -